Breaking News

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण विना परवानगी बसविलेला छत्रपतींचा पुतळा आणि पोलिस पोलिस प्रशासनाने काढला

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यावरून पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण झाले आहे. येथील महापालिकाचे मुदत मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात संपली आहे. मात्र या अद्याप निवडणूक आयोगाकडून आणि राज्य सरकारकडून येथे प्रशासक बसविण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याने आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे.

अमरावती महानगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनादिवशी येथील भाजपा पुरस्कृत आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. मात्र प्रशासनाने विना परवानगी पुतळा बसविल्याने तेथून सुरक्षित स्थळी हलविला.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी त्यांच्या घरातच स्थानबध्द केले. परंतु यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहर बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच लहुजी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडल्याने अमरावती शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले आहेत. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही गडबड करू नये आणि शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. आमदार राणा यांच्या घरालगत दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, खासदार नवनीत राणा घराबाहरे पडून कार्यकर्त्यांना भेटल्या. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राणांच्या घराबाहेर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होते.

आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून ठाकरे सरकारने त्यांची हुकुमशाही वृत्ती दाखवली आहे. दहशतवादी असल्यासारखे खासदार आणि आमदारांना स्थानबद्ध केलं जातेय. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेय. अशा प्रकारे ठाकरे सरकार छत्रपतींचा अपमान करतेय असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

तर खासदार नवनीत राणा यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत घराच्या बाहेर येवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांना काही काळासाठी खासदार राणा यांनाही ताब्यात घेतले होते.

या तणावपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून कोणीही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यादृष्टीने प्रयत्न करू नये असे आवाहनही केले.

दरम्यान महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आव्हान देण्यासाठी राणा पती-पत्नीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्यात येत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे. त्याचबरोबर येथील महापालिकेची मुदत डिसेंबर मध्ये संपली आहे. परंतु महापालिकेची निवडणूक घेण्यासंदर्भात किंवा त्यावर प्रशासक नेमण्यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारणाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *