Breaking News

गृहमंत्री वळसेंचा टोला, केंद्राला विचारू तुमचे झेड सिक्युरीटीवाले कुठेयत? स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही

आरोप करणं सोपं असतं आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्या यांना लगावत केंद्राला तुमचे झेड सिक्युरीटी असलेले कुठे आहेत याचीही विचारणा करू असा खोचक टीका त्यांनी केली.
सेव्ह विक्रांत अभियानाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरीकांकडून गोळा केलेल्या निधीवरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पुढील चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजाविल्यानंतर सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून सोमय्या हे नॉट रिचेबल झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उपरोधिक टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बंद करण्यात आलेला जनता दरबार पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे. आज जनता दरबारात आले असता त्यावेळी ते बोलत होते.
किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता, तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत असे केंद्राला विचारू अशी खोटक
टोला त्यांनी सोमय्या आणि केंद्राला लगावला.
त्याचबरोबर सिल्व्हर ओक प्रकरणाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सदावर्ते प्रकरणाविषयी रितसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहेत. त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना उघड करणं योग्य नाही.
सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवलं होतं तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही त्यामुळे संबंधित डीसीपीची बदली करण्यात आली आहे. तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे. अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *