Breaking News

तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या… टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही -शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मराठी ई-बातम्या टीम
म्हाडा पेपर फुटीप्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांना टीईटी राज्य परिक्षेचे पेपर फुटल्याची माहिती पुढे आली असून राज्य परिक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या घरी ८८ लाख रूपयांची रोकड तर टीईटी परिक्षेचे पेपर यासह जवळपास ४ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.
या पेपर फुटीप्रकरणी पुणे पोलिसांन सुपे यांना अटक करत याप्रकरणाशी संबधित अन्य व्यक्तींचा तपास सुरु केला आहे. याचबरोबर टीईटी परिक्षेसह इतर कोणत्या परिक्षेचे पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही.
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

 

Check Also

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *