संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. हे अधिवेशन वादळी ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीवरून विविध तर्क-वितर्क लढविले जात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेचा तपशील दिल्लीत पत्रकार परिषद घेत जाहीर केला.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझी भेट झाली. मात्र या भेटीत मर्यादीत विषयावर चर्चा झाली. यावेळी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देवून वर्षाहून अधिक काळ लोटला. परंतु त्यावर अद्याप राज्यपालांनी मंजूरी दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
याचबरोबर शिवसेना प्रवक्ते तथा सामना वर्तमान पत्राचे संपादक असलेले संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत काही बाबी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आणून दिली. तसेच संजय राऊत हे संपादक असून त्यांच्यावर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करणे हा अन्याय असल्याची बाब पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पवार यांनी सांगत केवळ संजय राऊत हे वेगळी वक्तव्ये करतात म्हणून असा सवालही पवारांनी केल्याचे सांगितले.
राज्यात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असून तिघांचे उत्तम चालल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट करत आम्ही भाजपासोबत कोणतेही संबध ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता पवार म्हणाले की, यावर मी बोलू इच्छित नसल्याचे सांगत २०१९ ला राज आमच्यासोबत होते. भाजपाला मते देऊ नका असे म्हणत होते. आता ते भाजपासारखे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि खाते अदला-बदलीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मंत्रीपद अदला बदल होणार नाही. मात्र राष्ट्रवादीच्या ज्या जागा खाली आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील भेटी वेळी लक्षद्विपचे खासदार फैजल हे ही उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदींसोबत प्रशासक तथा राज्यपाल प्रफुल पटेल हे ही उपस्थित होते. यावेळी लक्षद्विपमधील नागरीकांच्या समस्या पटेल यांना सांगितल्या तसेच त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
