Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, यापूर्वी जे करत आलो तेच करायचंय

अवघ्या काही दिवसानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून लगेच दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्या दिवशी शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात साजरा करण्यात येतो. परंतु दसरा मेळाव्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या गटाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या दोघांच्या अर्जाला जवळपास महिना उलटून गेला असला तरी मुंबई महापालिकेने अद्याप दोघांपैकी कोणालाही त्यासाठी परवानगी दिली नाही.

यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा निर्धार व्यक्त करत यापूर्वी जे करत आलो तेच यापुढेही आपल्याला करायचं आहे असा सूचक शब्दात शिवसैनिकांना आदेश दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील विभाग प्रमुखाशी बैठक घेत आगामी दसरा मेळाव्यावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याविषयी बोलताना यावर्षी होणारा दसरा मेळावा विशेष असणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शिवसैनिक चिडून उठलेला आहे. शिवसैनिकांच्या अंगात वेगळे तेज आलेले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत अत्यंत संयमाची भूमिका घेतली. आपण जे काम यापूर्वी करत आलो आहोत, तेच काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने दिली.

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या दोन विषांयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये २१ तारखेला गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांचा मोळावा होणार आहे. या मेळाव्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे दोन्ही मेळावे चांगले व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहिजे. त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी, असे या बैठकीत सांगण्यात आल्याचे त्या उपविभाग प्रमुखाने सांगितले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *