Breaking News

ठाकरे गटाचे वकील म्हणाले, शिंदे गटाचा वाद म्हणजे लोकशाहीची थट्टा आयोगासमोर युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून निवडणूक आयोगात पोहोचलेला वादावर १७ जानेवारीनंतर आज २० जानेवारी रोजी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आज युक्तीवाद केला. या आधीच्या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असल्याचे सांगत पुढील तारखेची मागणी केली होती. त्यानुसार आज कपिल सिब्बल यांनी जवळपास एक तासाहून अधिक काळ ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी कपिल सिब्बल युक्तीवाद करताना म्हणाले, शिवसेनेतून काही आमदार-खासदार गेले म्हणून पक्षात फूट पडली नाही. तसेच पक्ष जागेवरच आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर शिंदे गट एक महिना का शांत बसला असा सवाल करत शिंदे गटाचा वाद म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप केला.

नव्या वर्षातील पहिल्याच जानेवारी महिन्यातील १० जानेवारी, १७ जानेवारी त्यानंतर आज २० जानेवारीला झालेली ही तिसरी सुनावणी झाली. मागच्या वेळी ठाकरे गटाने पुढची तारीख मागून घेतली. त्यानुसार कपिल सिब्बल यांनी आज सविस्तर युक्तीवाद केला. यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की, शिवसेना पक्षाची जी घटना आहे ती आधी स्विकारायची आणि नंतर ती मान्य नाही म्हणत पक्षातून बाहेर पडत पक्षावरच दावा करायचा ही सरळ सरळ लोकशाही रचनेची थट्टा असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार पक्षात शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ही पदे निर्धारीत करण्यात आली आहेत. त्यानुसार पक्षाचे प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे हे आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी धारण केलेले मुख्य नेते या पदाची तरतूदच पक्षाच्या घटनेत नाही. त्यामुळे कोणत्या आधारे एकनाथ शिंदे यांनी पद धारण केले हे समजायला मार्ग नाही ही बाब ही सिबल यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे गटाची आत्तापर्यंत झालेली कार्यवाही ही शिंदे गटाकडे आहे का? कागदावर ही कार्यवाही आहे का? असं म्हणत शिंदे गटाच्या कार्यकारिणीलाही कपिल सिब्बल यांनी आव्हान दिले.

जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी बंड केलं होतं तर निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी एक महिना का लावला? असा सवाल करत राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे असंही कपिल सिब्बल यांनी सांगितले. ठाकरे गटाची कार्यकारिणी ही बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरे कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे असेही कपिल सिब्बल म्हणाले.
तसेच उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी अनेक सदस्य असून पक्षप्रमुख पदावर कार्यकारणीने ठाकरे यांची निवड केलेली आहे. तसेच त्याची मुदत २३ जानेवारी पर्यंत आहे. तसेच ही सगळी प्रक्रिया पक्षाच्या घटनेनुसार झालेली असल्याची बाबही निदर्शनास आणून देत सिब्बल पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कशाच्या आधारे पक्षाच्या मुख्य नेते पदी झाली आहे असा सवालही उपस्थित केला.
दरम्यान, कपिल सिब्बल यांनी आपला युक्तीवाद संपल्यानंतर थेट आयोगातून बाहेर पडले, त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे वकील मनविंदर सिंग आणि महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाची बाजू मांडली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *