Breaking News

उध्दव ठाकरे आले फुल्ल अॅक्शन मोडवर, बंडखोर समर्थकांवर कारवाईचा बडगा विश्वनाथ भोईर यांच्यापाठोपाठ भावना गवळी, संजय राठोड धक्का

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर त्यांच्यासोबत संजय राठोड हे गेले तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांच्या कृतीचे समर्थन करत उध्दव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी जुळवून घ्यावे असे आवाहन केले. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरी खपवून घ्यायचे नाही अशी भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेत अशा एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिक आणि आमदार-खासदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी १६ जुलै रोजी शिवसेनेने आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहराच्या प्रमुखपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर आता शिवसेनेने यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्या समर्थकांवरही कारवाई केली. येथे विद्यमान यवतमाळ शहरप्रमुख, यवतमाळ जिल्हा सहसंपर्कप्रमुख तसेच आर्णी तालुकाप्रमुखांची उचलबांगडी करुन नव्या नियक्त्या करण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोर आमदारांवर कारवाई करु नये, अशी विनंती केली होती. तर आमदार संजय राठोड यांनी उघडपणे शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांमध्येही ते सहभागी होते. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेता शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पदांवर नव्या नियुक्त्या केल्या आहेत. भावना गवळी तसेच संजय राठोड यांना समर्थन देणाऱ्या यवतमाळ शहरप्रमुख, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख, तसेच आर्णी तालुकाप्रमुखांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. येथे नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने तसे स्पष्ट केले आहे.

याआधी शिवसेनेने शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहरप्रमुख या पदावरुन हकालपट्टी केली. भोईर यांना हटवल्यानंतर कल्याणच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी सचिन बासरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ या दैनिकातून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. याआधी शिवसेनेने शिंदे गटातील संतोष बांगर आणि सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई केली. बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन तर तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आले. तसेच ठाण्याचे नरेश मस्के यांचीही उचबांगडी करण्यात आली. मात्र या तिघांचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्ननियुक्ती केली. त्यामुळे आता शिवसेनेत उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे सरळ गट पडल्याचे दिसून येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *