Breaking News

फडणवीसांच्या सेलिब्रेशनवर मिटकरी म्हणाले…पोर्तुगीजांनीही गोवा जिंकल्यावर… अमोल मिटकरींची खोचक टीका

गोव्याचे प्रभारी म्हणून राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बजाविलेल्या कामगिरीमुळे गोव्यात भाजपाला यश मिळाले. गोव्यातील विजयानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला परतत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळ ते नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तसेच गडकरी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे कौतुक करत पेढाही भरविला. फडणवीसांच्या या सेलिब्रेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र खोचक टीका केली.
अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विट करत गोवा जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनीही विजयोत्सव साजरा केला होता. परंतु त्यांना महाराष्ट्र काबीज करता आला नाही असे सूचक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही. कारण इकडे जंजिरा, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग व मजबूत आरमार “छत्रपती शिवाजी महाराजांनी” निर्माण करुन ठेवले होते” असे ट्विट करत एकप्रकारे इशाराच दिला.

दरम्यान सत्काराला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असून तसेच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेले प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचे भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त करत “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटले तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.