लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. तसेच दर महिन्याला १५०० रूपये देत विधानसभा निवडणूकीच्या कालावधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले. त्यानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या बाजूनं मतदानही केले. त्यामुळे राज्यात महायुती सरकार विराजमानही झाले. मात्र लाडकी बहिणी योजनेतील महिलांना २१०० रूपये देण्याच्या घोषणा वास्तवता काही केल्या प्रत्यक्षात उतरायला तयार नाही. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत निवेदन करत लाडक्या बहिणीच्या २१०० रूपये देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती दिली.
लाडकी बहिण योजनेतील काही महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या मुद्याला उत्तर देत म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला. त्यावेळी त्यात नमूद करण्यात आलं होतं की, १५०० हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल त्या महिलांना लाडकी बहिण योजना लागू होणार नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे निवेदन करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, नमो शेतकरी योजनेत महिलांना १०० रूपयांचा लाभ मिळतो, शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रूपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थीना त्या योजनेतून १००० हजार रूपये आणि ५०० रूपये लाडकी बहिण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही २० ते २५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं असल्याच्या अफवा असल्याचा खुलासाही यावेळी केला.
लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने शिवसेना उबाठाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी मंत्री आदिती तटकरे यांना तीन प्रश्न उपस्थित करत त्याची उत्तरे मागितली. वरूण सरदेसाई पुढे बोलताना म्हणाले की, या योजनेच्या अनुषंगाने तीन प्रश्ने आहेत. पहिला, निवडणूकीपूर्वी ही घोषणा जाहिर करण्यात आली. तेव्हा या योजनेचे किती लाभार्थी होते, दुसरा प्रश्न, निवडणूकीनंतर या योजनेतील महिलांसाठी सगळे नियम लागू करण्यात आले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र करण्यात आलं, आणि तिसरा तसेच या योजनेतील लाभार्थी महिलांना २१०० रूपये देणार आहात की नाही असे तीन प्रश्न उपस्थित केले.
वरूण सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, ऑक्टोंबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहिण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिला लाभार्थी होत्या. फेब्रुवारी महिन्यात आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४७ लाखाहून जास्त होती. याचा अर्थ लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढलेली असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, महायुती सरकारने योजना आणली आहे. महिलांना १५०० रूपये देणारं महायुतीचं एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रूपये देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघे मिळून योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, अर्थसंकल्पात २१०० रूपये देण्याबाबत कोणतेही भाष्य केले नसल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, लाडकी बहिण योजनेतील महिलांना २१०० रूपये देण्याबाबत आम्ही निर्णय घेणारच आहोत. मात्र तत्पूर्वी राज्याचा अर्थसंकल्पाचं संतुलनही राखणं महत्वाचं असून ती घोषणाही पूर्ण करायची आहे. जर शाश्वत योजना चालु ठेवायची असेल तर आर्थिक शिस्तही महत्वाची आहे. आर्थिक संतुलन राखत सर्व योजना पूर्ण करणार असल्याचेही सांगितले होते.