Breaking News

छगन भुजबळांनी केले उध्दव ठाकरे यांचे कौतुक, सर्वस्व गमावल्यानंतर सुध्दा… दुसरं कोणी असते तर अंथरूण धरलं असतं

साधारणतः आठ महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्ताही स्थापनही केली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांना राजकियदृष्ट्या मोठा धक्का बसला. परंतु त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कौतुक केले.

छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त नांदेड येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा दिलेल्या प्रकट मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, नाव आणि चिन्ह गेलं तरीही उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लोकांना संबोधित करतो, ही सोप्पी गोष्ट नाही. यांच्या जागी दुसरं कोण असतं, तर अंथरूण धरलं असतं. पण, हीच खरी कसोटी आहे, एखाद्या व्यक्तीमत्वाची असे सांगत उध्दव ठाकरेंच्या नव्या इनिंगचे कौतुक केले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अनेकजण म्हणतात मी समाजकारणी, राजकारणी, वक्ता, महापौर झालो. पण, कोणीही हे सांगत नाही की जेलयात्रा सुद्धा आहे. जे म्हटल्यावर सर्वांना भीती वाटणार. ती काय आरामदायी यात्रा नसते. जेल काय असतं ते अडीच वर्ष आतामध्ये राहिल्यावर कळलं. मात्र, तेव्हा सर्वात जास्त सहकार्य अनेक पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं मिळालं, असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना कायम मुख्यमंत्री की विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडेल, असं विचारला असता छगन भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडणार. कारण, ते विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करतात असा खोचक टोलाही लगावला.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, खा.शरद पवार साहेब यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांनी देशातील आणि राज्यातील ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. शासन कारभार करतांना सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे. पवार साहेबांनी आपल्या सत्तेच्या कार्यकाळात सर्व जनतेला न्याय दिला. त्यांच्या हिताची जोपासना केली. त्यांना अधिक ताकद यापुढील काळातही आपल्याला द्यायची आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली

राष्ट्रवादी काँगेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *