Breaking News

जाधवांच्या मी चापट मारली या स्वःकबुलीवर सुषमा अंधारे यांनी सांगितली हकिकत… अप्पासाहेब जाधव हे स्वतः बोलतायत यावरून ते आधीच ठरवून आलेले

मागील दोन दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना आपण दोन चापटा मारल्या असा दावा करणारा ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी सविस्तर घटनाक्रम सांगत खरचं मारहाण झाली का? काय घडलं याची हकिकत सांगितली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रा २० मे रोजी होणार आहे. ही सभा ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे. आतापर्यंत जेवढ्या महाप्रबोधन सभा झाल्या त्या सर्व वादळी झाल्या. महाप्रबोधन यात्रा म्हटलं की चर्चा, वाद हे आलेच. विशेष म्हणजे या समारोप सभेला संजय राऊत असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदाच महाप्रबोधन सभेला मी आणि संजय राऊत मंचावर एकत्र असणार आहोत. त्यामुळे बऱ्याच लोकांना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. बीडमध्ये बरीच वर्षे शिवसेनेची पडझड होत आहे. आता नव्याने शिवसेना उसळी मारत आहे.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, काल आम्ही स्टेजची पाहणी करायला गेलो होतो. स्टेजची पाहणी झाली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. त्यानंतर आप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. ते बऱ्यापैकी नाराज होते. या नाराजीचं कारण बॅनरवर फोटो नाही असं होतं. यावर मी त्यांना आपण बोलू असं सांगितलं. आमचे दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी इथं बोलायला नको, हॉटेलवर जाऊन बोलू असं सांगितलं. त्यानंतर मी ठीक म्हणून गाडीत बसले, अशी माहिती दिली.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, गाडीत मी फेसबूक लाईव्ह करून सभेच्या तयारीची माहिती देत होते. त्याचवेळी त्यांनी एका मुलाला काही कामं सांगितली. तेव्हा त्या मुलाने मी मजूर नाही, नीट बोला असं सांगितलं. यानंतर मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असं बोलतो का, असशील तू जहागिरदार असं म्हणत शाब्दिक बाचाबाची वाढत गेली. त्याचं भांडणात रुपांतर झालं आणि मारामारी झाली. गाडी फुटली.
हे सर्व झाल्यावर आमचा असा प्रयत्न होता की, काहीही झालं तरी सभेला गालबोट लागता कामा नये. कारण असं काही झालं आणि गोंधळ झाला, तर काय करायचं. आम्हाला सभेवर लक्ष द्यायचं होतं. आम्ही एवढा खर्च केला, जीव तोडून मेहनत घेतली. सामान्यपणे मी प्रबोधन यात्रेला थेट मंचावर जाते. मात्र, पहिल्यांदा मी चार दिवस थांबून तयारी करते आहे. कारण माझ्या जिल्ह्यातील ही सभा आहे. म्हणून मी अधिक लक्ष देते आहे, असं असताना आम्ही हे जिथल्या तिथं मिटवण्याचा प्रयत्न करत होतो, असंही सांगितलं..

सुषमा अंधाऱ्या म्हणाल्या, स्थानिक कार्यकर्ता गणेश वरेकर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचं म्हणत होता. मात्र, आम्ही असं करायला नको, आपल्याला सभा करायची आहे असं समजावून सांगितलं. मी बराच विचार केला आणि मला असं नक्की वाटतं की, आप्पा जाधव ठरवून प्लॅन करून आले होते. त्यांना सभेच्या आधी गोंधळ घालायचा होता. एवढं करूनही आम्ही शांतता बाळगत होतो.

सुषमा अंधारेंवर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस समोर येऊन स्वतःच सांगतो की मी हाच उचलला. याचा अर्थ निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो, असं मतही अंधारेंनी व्यक्त केलं.

तुम्हाला मारहाण झाली का? या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या, नाही. मला मारहाण झाली असती तर अप्पासाहेब जाधव परत गेले असते का. हे प्रकरण आतापर्यंत थांबलं असतं का. हा दावा करून त्यांना गोंधळ तयार करायचा आहे. यातून आमचं सभेवरील लक्ष विचलित व्हावं असं त्यांना वाटतं. काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे असेही त्या म्हणाल्या.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *