Breaking News

लोढांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केल्यानंतर जो वाद निर्माण झाला. त्याची राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या घटनेची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेशी केली. यावरून राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले असून यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोढांना टोला लगावत म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला असं बोलून कसं चालेल? त्यामुळे हे आम्ही सहन नाही करणार असा इशाराही दिला.

आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज बॅलार्ड पिअर्स येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, एखादं उदाहरण देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, हेच चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलनाच होऊ शकत नाही. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशाराही दिला.

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? असा सवालही अजित पवारांनी विचारला. एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती याची आठवणही त्यांनी करून दिली.

वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांची कानउघडणी केली.

किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केले.

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,असे वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *