Breaking News

नाना पटोलेंच्या त्या भाकितावर भाजपाच्या बावनकुळेंचे प्रत्युत्तर, २० आमदारांचा… विधानसभेत दोन वेळा १६४ आकडा पार केलाय

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अमरावतीत बोलताना १४ फेब्रुवारीला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याचे भाकित केले होते. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, नाना पटोले यांनी केलेले सरकार कोसळण्याचे वक्तव्य तथ्यहीन व हास्यास्पद आहे. उलट राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आणखी सुमारे २० आमदारांचा पाठिंबा वाढेल, असा दावा रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. आम्ही दोन वेळा विधानसभेत १६४ चा आकडा पार केला. एकदा विश्वास प्रस्तावावेळी तर काँग्रेसचे १० आमदार गैरहजर होते. पुन्हा विश्वासमताची वेळ आल्यास शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या १८४ पर्यंत पोहोचेल, असा दावा बावनकुळे यांनी केला.

महाविकास आघाडीतील ५० आमदार केव्हा गेले, हे कळले देखील नाही. आता १० आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही. महाविकास आघाडीतील आमदारांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देण्यात येते. सकाळी उठून सुरू होणारा भोंगा कुणालाच आवडत नाही, असा टोला बावनकुळेंनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना लगावला.

महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार देखील नसतील. यापूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांचा पेनही चालत नव्हता, अशी टीका बावनकुळे यांनी करून विरोधकांनी विरोधी पक्ष म्हणून योग्य पद्धतीने काम करावे, असा सल्ला देखील दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, उमेदवार डॉ. रणजीत पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आदी उपस्थित होते.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *