Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; वारसा जपावा लागणार, पंचतत्व पालन व्हावे परिवारवाद हा राजकारण आणि संस्थामधून हटावावा लागणार

देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाल मध्ये प्रवेश केला आहे. येथून पुढची २५ वर्षे भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला येणाऱ्या काळात प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस काम करावे लागणार आहे. देशात निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे, लहान मुलांना देण्यात येणारी खेळणी ही पण देशातच तयार झालेली असली पाहिजे यादृष्टीने आत्मनिर्भर भारत ही योजना आपण राबवित आहोत. मात्र ही फक्त सरकारी योजना नाही तर जनचळवळ झाली पाहिजे असे मतही व्यक्त केले.

आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं. देश यापुढे पंचतत्व आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिले तत्व आहे. दुसरे तत्व गुलामीचा अंश बाहेर काढणे हा आहे. गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. आपल्या मनात गुलामीचा थोडाजरी अंश असेल तर तो काढून टाकला पाहिजे. तिसरे तत्व म्हणजे आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे. चौथे तत्व खूप महत्त्वाचा आहे. ते तत्व म्हणजे एकता आणि एकजुटता होय. १३० कोटी जनतेमध्ये एकता हवी. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथे तत्व आहे. पाचवे तत्व म्हणजे नागरिकांच कर्तव्य हे आहे. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा देखील समावेश आहे. आगामी २५ वर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची तत्वशक्ती असल्याचे सांगत या पंचतत्वांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या समाजात आजही महिलांचा अपमान केला जातो. तो करू नये. महिलांचा सन्मान करायला हवा. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणून द्यावी, असे आवाहन करत ते पुढे म्हणाले, तसेच देशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेने साथ द्यावी. भ्रष्टाचाऱ्यांप्रती जोपर्यंत चीड निर्माण होणार नाही, तोपर्यत देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे. त्याचबरोबर राजकारणांबरोबरच संस्थांमध्ये शिरलेला परिवारवाद हा सुध्दा संपविण्यासाठी देशातील नागरिकांची साथ हवी असल्याचे सांगत खेळाच्या संस्थांमध्ये जेव्हा मुक्तपणे प्रत्येकाला संधी मिळायला लागली. तेव्हा याच खेळांडूंकडून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकण्यात येवू लागली. त्यामुळे अभिमानाने आमची छाती भरून पावत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. आधारकार्ड, मोबाईल या आधुनिक साधनांचा वापर करून चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवण्यात आम्हाला यश आले. मागील सरकारमध्ये जे लोक बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोकांना तुरुंगात डांबलं आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.

आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही

घराणेशाही हादेखील एक मुद्दा आहे. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरुकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल.

राजकारणातही परिवारवाद संपवायला हवा. घराणेशाहीच्या राजकारणाला देशाशी काही देणघेणं नसतं. याच कारणामुळे देशातील राजकारण शुद्धीसाठी घराणेशाहीच्या मानसिकतेला दूर करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले.

याशिवाय देशात लवकरच ५ जी प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा प्रसार आणखी होण्यास मदत होणार आहे. शेतीच्या बाबत आपल्याला आगामी काळात जास्तीत जास्त रासायनिक खते विरहित शेती करण्याकडे आपल्याला भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पध्दतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *