Breaking News

उध्दव ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या तर भाजपाला टोले शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी साधला शिवसैनिकांशी संवाद

मुंबई : विशेष प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून काहीजण स्वबळाचा नारा देत आहेत. पण स्वबळाचा नारा म्हणजे फक्त निवडणूकी पुरताच नसतो. अन्यायाच्या विरोधात वार करण्यासाठी ते उचलण्यासाठी लागंत ते स्वबळ असत. त्यासाठी स्वबळ कमावावे लागते असा टोला काँग्रेसचे नाव न घेता लगावत कोरोनानंतरची परिस्थिती आणि येणाऱ्या आर्थिक संकटाचा कोणताही विचार न करता फक्त निवडणूका ऐके निवडणूका म्हणून तयारीत राहून कोरोना काळात फक्त राजकारणाच्या माध्यमातून विकृतीकरण करण्याचा प्रकार काहीजणांकडून सुरु असल्याचा आरोप भाजपा आणि विरोधकांचे नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्यासह पहिल्या फळीतील शिवसेना नेते उपस्थित होते.

सत्ता शिवसेनेच्या हाती असल्याने काहीजणांचे पोट दुखतेय, त्यांचा जीव कासावीस होतो आहे. परंतु त्यांच्या आजारावर ते उपचार बघतील मी काही डॉक्टर नाही की त्यांना औषध द्यायला. शिवसेना आता पूर्वीपेक्षा बलवान झाली असून आमचाही स्वबळाचा नारा आहे. आमचा फक्त स्वबळाचा नारा नव्हे तर तो आमचा हक्क असल्याचे सांगत आगामी निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

सर्वजण स्वबळाचा नारा दिला म्हणजे झालं असे होत नाही. त्यासाठी आपलं स्वत:चही बळही असायलाच हवं स्वत:च बळ आणि आत्मविश्वास असेल तरच या गोष्टी होतात. मराठी माणसाला पूर्वी अपमानास्पद जगावं लागत होतं. मात्र शिवसेनेने मराठी माणसाला स्वबळ आणि आत्मविश्वास दिल्याचे सांगत स्वबळ हे फक्त निवडणूकीपूरतं नको तर ते तलवारीचे पात उचलण्यासाठी आणि अन्यायाविरोधात वार करण्याचं बळ हवं असे सांगत काँग्रेसच्या नेत्यांना एकप्रकारे त्यांना राजकिय ताकद किती आहे हे तपासण्याचा सल्ला त्यांनी अप्रत्यक्ष दिला.

स्वबळ म्हणजे काय असतं हे पश्चिम बंगालने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत दाखवून दिलं. तेथे ममता बँनर्जी या एकट्याने लढल्या आणि त्यांनी विजय मिळवून दाखविला. त्यांच्यापेक्षा तेथील जनतेचे खरे तर मी आभार मानेन. निवडणूकीच्या काळात त्यांच्यावर आतून बाहेर हल्ले झाले. त्या सर्व हल्ल्यांवर मात करत प.बंगालच्या जनतेने प्रादेशिक अस्मिता कशी जपायची असते याचा एका धडा देत स्पष्ट निकाल दिला. प.बंगालने पारतंत्र्यांत असतानाही ही देशाला नेते दिले आणि आताही त्यांनी धडा दिला. यालाच प्रादेशिक अस्मिता आणि स्वबळ म्हणतात असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मराठी माणसाची भूमिका मांडली तेव्हा आम्ही संकुचित होतो. नंतर हिंदूत्वाचं धोरण अंगिकारलो. महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून आता शिवसेनेने हिंदूत्व सोडलं, आता काय सत्तेसाठी काहीही करत असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. मात्र मी यापूर्वीही म्हणालोय आमचं हिंदूत्व हे शेंडी जाणव्याचे नाही. तसेच हिंदूत्व हे काही कोणा एकाच पेटंट नसल्याचे सांगत हिंदूत्व हे आमचा श्वास असल्याचे त्यांनी भाजपाचे नाव न घेता त्यांनी टिका करत पूर्वीच्या काळी एका उंचीची माणसं होती. त्यांच्याकडे आदराने पाहता येत होते. मात्र आताची किती उंचीची आहेत? त्यांची उंची बघायला पायाकडे बघावं लागतं की आजूबाजूला बघावं लागत असा प्रश्न पडत असल्याचे सांगत सध्या राजकारणाच्या नावाखाली विकृतीकरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला देश हा प्रादेशिक अस्मितेवर उभारलेला आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर राज्याची निर्मिती झाली आणि राज्यातूनच देशाची रचना झाली. त्यामुळे आता काहीजण केवळ निवडणूकीसाठी या प्रादेशिक अस्मितेवर घाला घालत असून जर असेच प्रादेशिक अस्मितेवर घाला घालण्याचे काम सुरु राहीले तर देश छन्न विचिन्न होईल अशी भीती व्यक्त करत आमच्यासाठी आधी देश महात्वाचा त्यानंतर महाराष्ट्र महत्वाचा असल्याचे सांगत संकटाच्या काळात पहिल्यांदा महाराष्ट्रच सरसावतो असे सांगायलाही त्यांनी यावेळी सांगितले.

आता हे राजकारण वळत वळत चालले आहे. कोरोना काळात राजकारणाच विकृतीकरण आहे. सत्ता मिळवणं हे माझं स्वप्न नव्हतं. राज्यातल्या गरीबांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी काही निर्णय घेतले. सत्ता मिळवणं हे काही शिवसेनेचे साध्य राहीलेले नाही. त्यामुळे परिस्थितीमुळे ती जबाबदारी आल्याने ती स्विकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काहीजण म्हणतात की मी घराबाहेर पडत नाही. मी घरात आहे तर इतकं टेन्शन आहे. जर मी घराबाहेर पडलो तर टेन्शनच टेन्शन आल्याशिवाय राहणार नाही असा उपरोधिक टोला राणे पिता-पुत्रांचे नाव न घेता त्यांनी भाजपाच्या नेत्यांनाही लगावला.

काही जण शिवसेना ही हाणामारी करणारी, रक्त पाहणारी अशी ओळख पुन्हा एकदा करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही ओळख शिवसेनेची आहेच. पण रक्तदान करणारी शिवसेना ही ओळख आहे. शिवसैनिकांनी केलेले रक्तदान फक्त काय मराठी माणसांनाच मिळतं का? फक्त हिंदूंनाच मिळत का? ते सर्वांसाठी मिळतं. कोरोना काळ असो, चक्रीवादळ असो सर्वात आधी शिवसेनाच धावून जाते असे सांगत १९९३ च्या दंगलीत मुंबई शिवसेनेमुळेच वाचली याचा पुर्नरूच्चार करत आरोप करणारे या गोष्टी का विसरतात असे सांगत हि शिवसेनेची ओळख असून आरोप करणाऱ्यांची ओळख काय? त्यांनी आतापर्यत काय काम केले हे तरी सांगावे असा उपरोधिक टोला विरोधकांना लगावला.

सध्या दोन परिस्थितींचा विचार करावा लागत असून कोरोना आणि कोरोना नंतरचा काळ अशा दोन टप्प्यात विचार करावा लागत आहे. या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचे पालकत्व सरकारने घेतले असून रोजगाराच्या अनुषंगाने उद्योग विभागाने अनेक कंपन्याशी सामंज्यस करार केले. त्यास काही काळ जाणार असला तरी रोजगार उपलब्ध होतील. आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटाचा विचार करून सर्व राजकिय पक्षांनी यादृष्टीने विचार करणे गरजेचे असून अशा पध्दतीने कोणताही राजकिय पक्ष बोलताना दिसत नसल्याचे सांगत परिस्थिती अशीच राहीली तर देशात अराजकता माजेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वबळाचा नारा दिला पण भाकरी कशी देणार असा प्रश्न लोकांकडून विचारला जाईल. त्यावेळी काय तुम्ही मला सत्ता द्या मग मी तुम्हाला देतो म्हणणार का? असा सवाल करत तुम्ही सत्तेसाठी मला झुलविणार का? असे जनता विचारल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करत देश सध्या अस्वस्थेकडे जात असून अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका म्हणजे निवडणूका हा विचार बाजूला ठेवण्याची गरज आहे. सध्या राजकारणाचे विकृतीकरण सुरु आहे. आर्थिक संकटाचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त राज्याच्या अनुषंगाने किती राजकिय पक्ष विचार कर आहेत? कोरोनामुक्तीसाठी चळवळ झाली पाहिजे. स्वातंत्र्य ही पण लोकचळवळ झाल्यावरच देशाला स्वातंत्र्य मिळालं. कोरोनामुक्तीच्या या चळवळीत प्रत्येक माणूस सहभागी झाल्याशिवाय कोरोना मुक्त होणार नाही. शिवसेना ही सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही, तसेच उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही भलत्या सलत्यासाठी खांदा देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नसून आमच्या पावलांवर खंबीर चालून आम्ही आमची वाटचाल करू असा विश्वास शिवसैनिकांना देत आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी शेवटी दिले.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.