Breaking News

शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली टेस्ट, अंधेरी विधानसभा निवडणूक जाहिर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक -२०२२ कार्यक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चुल मांडली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवरच दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगण्यास सुरु झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२२ पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ७ ऑक्टोबर २०२२ (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – १४ ऑक्टोबर २०२२ (शनिवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – १५ ऑक्टोबर २०२२ (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ (सोमवार), मतदानाचा दिनांक – ३ नोव्हेंबर २०२२ (गुरुवार), मतमोजणीचा दिनांक – ६ नोव्हेंबर २०२२ (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा ८ नोव्हेंबर २०२२ (मंगळवार) आहे.

या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या ९ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.

या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *