Breaking News

गाढवाची लात डायरेक्ट सरकारात अंकुर विठ्ठलराव वाढवे लिखित राजकिय उपहास्तमक वगनाट्य

(या वगनाट्याचा आणि सुरू असलेल्या राजकीय, शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेवू शकता)
—————————————————-
(रंगमंचावर अंडेरवार, शाहीर, पंडित आणि प्रधान काही तरी चर्चा करत उभे आहेत तेवढ्यात महाराज येतात, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हे बघून एक दोनवेळा बळेच खोलतो तरीही कोणाचे लक्ष नाही हे बघून जोरात ओरडतो.)
महाराज : अरे काय चालंल रे बा!
प्रधान : थांब रे बा इथ काय चालंल थेच कळून नाही राहीले
महाराज : अर्थमंत्रीजी!
पंडित : हे बघा पहीलेच मोझे गणित जमत नाहीय त्यात तू डोक्याची…. बजाबाकी नको करू
महाराज : अबे ओय अरे राजा आहे मी राजा….. राजा! (अर्थमंत्री, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री लगेच सावरतात)
प्रधान : कोन आहे?
महाराज : कोन नाही राजा!
प्रधान : असा कानाखाली वाजवीन न….राजा आहे न? (नरेन होकारार्थी मान हालवतो) आत कसा आला मंग?
महाराज : (घाबरलेल्या आवाजात) हा माझा दरबार आहे, मी राजा…..
प्रधान : राजा आहे न! मंग पुकार दिल्याशिवाय आत आला कसा?
महाराज : काय होते एखाद वेळेस……..(सिंहासनावर बसायला जातो तेवढ्यात)
प्रधान : उठ! दिला का पुकार? प्रोटोकॉल नावाची कही पध्दत अस्ते का नाही? चल बाहेर निघ कृपुकार दिल्याशिवाय आत यायचं नाही लक्षात ठेव! चल निघ…….(नरेन घाबरून बाहेर निघून जातो प्रधान तोंडावर हात मारत अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे येतो) अरे बापरे, महाराजावर ओरडलो…
गृहमंत्रीजी पुकार द्या?
अंडेरवार : (खिसे चाचपडत) माझ्याकडे तर नाही
प्रधान : अरे बा पुकार! द्या
शाहिर : माझं काम नाही ते, व्दारपाल सिंगले सांगा
प्रधान : सिंग पुकार द्या!
शाहिर : लय मोठं पाठांतर आहे लेका…
प्रधान : मी करतो ना मदत भाउ!
शाहिर : पण माह्या काय फायदा?
प्रधान : तुले खर्रा देतो मस्त कच्ची, काळा, पनपट्टी, पनपराग, स्टार, किमाम
शाहिर : किमाम नको राजा गळा धरते
प्रधान : चालते घ्या
शाहिर : बा आदब
प्रधान : बा मुलाहीजा
शाहिर : होशियार
प्रधान : दयावान
शाहिर : प्रकाडपंडीत
प्रधान : न्यायप्रिय
शाहिर : दानशूर
प्रधान : बुध्दीजीवी
शाहिर : जीव जंतू प्राणी प्रिय
प्रधान : परंपरा प्रेमी
शाहिर : संस्कृती रक्षक
प्रधान : सत्वशील श्री श्री श्री श्री श्री
शाहिर : 108 वेळा श्री
प्रधान : नरेन महाराज
दोघेही : पधार रहे है!! (महाराज अजून आलेच नाही)
प्रधान : ओ महाराज झाला पुकार या आता
महाराज : थे शेवटी पू पू पू राहीलं न! (परत आत जातो, प्रधान सिंग कडे आशेने बघतो, सिंग तुतारी, सनई जसे जमेल तसे तोंडाने आवाज काढतो)
महाराज : ( राजाच्या ऐटीत सिंहासनावर येउन बसतो) मंग काय म्हणता?
अंडेरवार : काही नाही महाराज, सोयाबीनले भाव नाही, पेरणीचा खर्च बी नाही निघत यंदा.
महाराज : (जवळ जवळ चावडीवर गप्पा मारायला बसल्याप्रमाणे) किती बॅगा टाकल्या होत्या का?
अंडेरवार : पाच टाकल्या होत्या, घ्या पान घ्या?
महाराज : अन् अॅवरेज कितीचा आला?
अंडेरवार : पाचचा आला फक्त
महाराज : बंबाड आला न मंग, माह्यावालं त सगळ तनातच गेलं राज्या….. चूना लय लावला बा…
प्रधान : महाराज, तुम्ही राजा आहात
महाराज : हाव, आपल्याले शेतकऱ्याचे प्रॉब्लेम समजून घ्या लागन न! अन् तसही मी बी शेतकरी आहेकृ
प्रधान : (आवाज वाढवून) आता शेतात आहे का? नाही ना? तुम्ही आम्हाले इथं काय गवत उटायले बलवलं का?
महाराज : प्रधानजी आणि समस्त मंत्रीमंडळ आपण सगळे माझ्या एका आवाजावर धावून आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आपण आपला बहूमुल्य वेळ माझ्यासाठी काढलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे. ..
शाहिर : महाराज भाषणबाजी सोडा आम्हाले इकडं कायले बोलवलं ते शॉर्टकट मध्ये सांगा
पंडित : महाराज आपण हवा तेवढा वेळ घ्या कार्यक्रमा आधी प्रस्ताविक होणे गरजेचे आहे.
शाहिर : हाव का? हे बरं आहे तुम्हाले कुठं जाच असलं का काहीही चालते…
पंडित : हो, कारण तुमचं प्रत्येक वेळेस काही तरी असतंच की (दोघे हमरी तुमरीवर येतात महाराज मध्ये पडायचा प्रयत्न करतात पण त्यांना कोणीही भाव देत नाही)
म्हाराज : (ओरडतो) अबे शांत बसान का? कायची झामल झामल लावली? इथं मिटिंग कायच्यासाठी घेतली अन् तुमच काय चालंल?
अंडेरवार : हाव नं बरं कायच्यासाठी घेतली आजची मिटिंग?
महाराज : यायचा वाद मिटवायचा होता त्यासाठी बोलवली
अंडेरवार : झालं मिटलं न तुमचं सगळं? चला मंग घरी
महाराज : डोक्यावर पडला का रे अंडरवेअर!
अंडेरवार : अंडेरवार!
म्हाराज : हा तेच ते!
शाहिर : माफ करा महाराज, पण जे काही सांगायचं ते थोडक्यात सांगा
महाराज : थोडक्यात?
शाहिर : हो
महाराज : बरं…….. असं सगळं आहे
सगळे : काय?
महाराज : थोडक्यात एवढंच सांगू शकतो मी!
अंडेरवार : (गंभिर) ओके….. असं सगळं आहे तर…
प्रधान : ओ अंडेरवार! आता तुमचं काय?
अंडेरवार : नाही ते असं सगळं असल्यावर तसं सगळं कसं असेल याचा विचार करत होतो.
महाराज : अंडेरवार!
अंडेरवार : महाराज, अंडेरवार!
महाराज : आता तेच बोललो. गप्प बसा! तर आदरनिय मंत्रीमंडळ, मिटिंग बोलविण्याचे महत्वाचे कारण असे की,
आज माझी निवड झाल्यापासून मी पहिल्यांदा आपल्या राज्यात आलो आहे. त्यामुळे मला आपल्या राज्याची हाल हावाल तेवढेसे माहित नाहीत सो यू कॅन टेल मी सम थिंक अबाउट इट!
प्रधान : क्या बात है महाराज शिक्षणाच्या मानाने लय इंग्रजी बोलंले..
महाराज : (लाजून) कामाच्या बाता करा, मले तारीफ आवडत नाही.
पंडित : महाराज, लाज वाटत नाही?
महाराज : पंडितजी!
पंडित : महाराज, लाज वाटत नाही आपल्या राज्यातिल मुला मुलिंना…
महाराज : अच्छा असं आहे होय.
पंडित : सिनेमातल्या हिरो हिरोइन सारखे मुली सुध्दा जिन्स आणि ते गलुतं घालत आहेत
शाहिर : टी शर्ट!
पंडित : हा तेच ते!
प्रधान : पण पंडितजी तुम्ही तर शिक्षणमंत्री आहत ना? मग तुमचा आणि त्या काय घालतात त्याचा काय संबंध?
पंडित : नाही कसा? अहो असे कपडे घातल्याने मुलांच शिक्षणात आणि पर्यायी शिक्षकांच शिकवण्यात मन लागत नाही मुलांचे नापासाचे प्रमाण वाढले आहे.
महराज : काय? (बुडाला खाज सुटते)
पंडित : सगळा टि.व्ही. चा आणि फुकटच्या नेट पॅक चा परिणाम आहे महाराज!
शाहिर : महाराज टि.व्ही आणि नेट मुळे गावा गावातील, तळागाळातील, गरिब परिवारातील मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचप्रमाणे क्रीडा प्रकारात रूची वाढली आहे आणि सहभागही वाढला आहे. आता आपण आय पी यल सारखे सामने भरवू शकतो.
म्हाराज : वा!
शाहिर : पण महाराज, त्याचबरोबर आपले पारंपारिक गिली दांडू, लगोरी, लंगडी, लपाछपी, कांच्या, गोट्या यासारखे खेळ तर धोंडी दंडार, किरतन, तमाशा इ. कलाप्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
महाराज : काय? (खज सुटली)
अंडेरवार : इंटरनेट मुळे आपल्या राज्यातिल मुला मुलींच्या मनात प्रेम भावना वाढली आहे
महाराज : हेच तर……….
पंडित : हे मात्र खरे हो, आहो पण आपल्या जातीचा, धर्माचा, संस्कृतिचा मान आभिमान राहिला नाही, सगळे
तरूण तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत पण कोणी कोणााची जात पात बघत नाहीय. असंच सुरू राहीलं तर जात धर्म नाशेष होतिल आपण धर्म रक्षक या नात्याने काही तरी पाउल उचावे.
(मोहनच्या बुडाला खाज..मोहन काही बोलणार तेवढ्यात…)
प्रधान : आपली आर्थिक परिस्थिती शेजारच्या राज्याच्या तुलणेत…….
(मोहनच्या बुडाला खाज..)
प्रधान : गेल्या काही वर्षाच्या तुलनेत आपल्या कारर्कीदीत दलित हत्या, बलात्काराचे प्रमाण…. वाढले …… आहे….(मोहनच्या बुडाची खाज वाढत चालली आहे.)
मोहन : काय चावत आहे च्या माय बही…
शाहीर : खूर्चीची संप्रिग असन… तरी म्हणत होतो ओ एल यक्स वरून खरेदी करू नका…
मोहन : कीडा!! माझ्या खूर्ची मध्ये कीडे….
अंडेरवार : कोणाचे आहे…
सगळे : ये…..
अंडेरवार : कोणते आहे?
मोहन : वा काय सुंदर आहे! काय चपळ आहे पळून कसा राहिला पाहा ना!
प्रधान : ढेकुण आहे ते
मोहन : तुम्हाला कसं कळलं?
प्रधान : हे काय ऑनलाइन पाहत आहे
मोहन : किती निरागस आहे!
प्रधान : भयंकर चावते तो
पंडित : सुदंर!
प्रधान : आना इकडं जाळून टाकू नाहीतर पैदास वाढेल त्याची….
अंडेरवार : प्रधानजी एवढ्या सुंदर कीटकाला मारण्याची भाषा?
प्रधान : मग काय पाळायचा आहे का तो?
मोहन : वा बरी आयडीया दिली जींदा लवन प्रधानजी!
प्रधान : आहो महाराज, तो पाळीव नाही हो!
मोहन : कुठलाच प्राणी अथवा कीटक पाळीव नसतो! आपण त्याले जीव लावला त तो पण त्याच्या बदल्यात
जीव लावतेच, ठरलं तर मग आजपासून ह्या कीटकाले पाळायचं फक्त पाळायचंच नाही तर हे कीटक राजघराण्यातले महत्वाचे पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाईल तसेच आजपासून हे आपल राष्ट्रीय कीटक म्हणून मी घोषित करतो….
प्रधान : लयच कीडे आहेत याच्यात….
मोहन : काय?
प्रधान : लयच कीडे आहेत याच्यात, काय आहे एवढं, आपण दुसरा कीडा शोधू…
पंडीत : प्रधानजी, घोषणा झालेली आहे, महाराज! आता पुढे?
प्रधान : नामकरण सोहळा वगैरे ठेवा……
मोहन : वा प्रधानजी…. धन्यवाद! पंडीतजी अख्ख्या राज्यात दवंडी पीटवा आपण उद्याच याचा जंगी नामकरण
सोहळा साजरा करू पण सगळ्यात पहिले आपल्याले याची राहण्याची व्यवस्था करा लागन….
(विंगेतून आवाज येतो) आता मी कुठं राहू… माह्या संसाराले बट्टा लावला माय……
मोहन : कोण आहे रे आशा शूभप्रसंगी बोंबा मारत आहे?
सिंग : (धावत येवून) महाराज मंदी आली
अंडेरवार : अबे लेका आता कुठं? मागच आलती ना अर्थसंकल्प पण सादर केला होता त्याचा
सिंग : अंडेरवेअजी…..
अंडेरवार : अंडेरवार!
सिंग : हा तेच ते, मंदी म्हणजे मंदोदरी! मोहन महाराजाची बहीण आल्या…
प्रधान : हा ती पण काय मंदी पेक्षा कमी आहे का?
सिंग : काय करायच तिची एंट्री घ्यायची का? का हाकलून देवू?
मोहन : अबे बहीण आहे माझी आत पाठ……..
मंदी : असं कसं केल माय… माह्या संसाराची राख रांगोळी केली…
मोहन : मंदा…मंदा कायले टेबलून राहीली? काय झालं?
मंदी : काय सांगू, तोंड दाबून बुक्क्याचा मार देल्ला माय
मोहन : प्रधानजी! तुम्ही जा तयारीला लागा हे प्रकरण जरा गंभीर दिसून राहीलं (सगळे जातात) मंदा आता सांग काय झालं? भावजी सोबत भांडण झालं का?
मंदी : तुया मायचा भावजी!
मेहन : मंदे असं बोलू नये!
मंदी : मंग कसं बोलाव? त्याचा खाण खराब होवो
मोहन : मंदे असं काउन बोलून राहीली तू? भावजी सारखा देव माणूस शोधून सापडणार नाही पाय..
मंदी : हम्म देव मानूस! मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली, सगळे तुया सारखे नसतात बाबू… आई गेल्यावर तुले लहानाच मोठं माह्या केलं, माह्या भाउ कसा निंघाला पाहा त् अन् हे पाहा चार वर्ष नाही झाले लग्नाले लेकरू नाही म्हणून लागला दुसऱ्या बाईच्या मांग… घरात फुटका कप नव्हता मी
होतो म्हणून संसाराचा डोलारा उभा केला मिनं! जीवाचं रान करून उन्हातान्हात लोकायच्या मजूरीले गेलो, जाते का कोणी राजघराण्यातलं? पण मी गेलो मी!… अन् यान असं केलं पाय खोरून मरनं पण त्याच्या दारात पाय नाही ठेवणार मी आता…
मोहन : बर बा रहा तू इथंच, असही आपल्या राज्यात मोठा नामकरण सोहळा आहे
मंदी : कोणाले लेकरू झालं का?
मोहन : लेकरू नाही आपल्या राज्यात एक नविन कीटक आलं आहे त्याले मी राज्य कीटक म्हणून घोषित केलं
मंदी : हे बेस केलं
मोहन : पण थ्याचं नाव ठेवायचं राहीलं थ्याचाच सोहळा आहे.. बरं झालं तू आली आता त्याले आत्याबाईचं प्रेम बी मिळन…
तो परंपरेचा ढेकुण असा चावला खूर्चीत कीकटक नसून राज्यकीटक ते बोलले ओघात धावपळ गडबड तयारी ती नामसोहळ्यची विशाल काय तो सोहळा ही गोष्ट अभिमानाची….. हा रं जी….
—–अंधार—–

प्रवेश 2
(पाळण्याची दोरी घरून सगळे आंदाने पाळना गात आहेत, नामकरण सोहळा सुरू आहे)
आठ पायाच, गोल पोटाच
निमुळत्या तोंडाच, आलया बाळ
नाव तयाचं ठेवायच काय
जो जो बाळा जो रे जो….

राहन त्याचं अडगळीत
गादीत चादरीत खूर्ची फटीत
आवडेना त्यास उन ग बाई
जो बाळा जो रे जो…..

चुनू चुनू चावे तुरूतुरू धावे
लाईट पडता पटकन लपे
अंड्यावर अंडी हजार घाले
जो बाळा जो रे जो…..

जन्माला येता लाल रंगाचे
मोठे होता तपकीरी रंगाचे
एक मारता दोन जन्मते
जो बाळा जो रे जो…..

(मंदी आणि बाकी बाया राणी सहीत) : राम घे, लक्ष्मण घे, परशूराम घे
मंदी : (कानात) ढेकणेश्वराच्या नावानं घुगूऱ्या खा, ढेकणेश्वराले खेळाले न्या काना काना कुर्रर्रर्र र्रा
बाकी सगळया: म्हसी गेल्या दुर्रा (हसतात)
पंडीत : वा वा मंदा ताई राजघराण्याला शोभेल असंच ठेवलं ढेकणेश्वर!
अंडेरवार : अमर रहे!
मोहन : अंडरवेअर!!
अंडेरवार : अंडेरवार महाराज!
मोहन : हा थेच थेच, वा मस्त नाव ठेवलं मंदे, काय बे लबाडा कसं वाटून राहीलं नाव तुले? प्रधानजी! याचा
रंग असा फिका कावून वाटून राहिला बरं?
प्रधान : फिक्का नाही पडणार त काय होईल काल रात्रीपासून खाल्ल कुठं त्यान!
मेहन : अरे बापरे! मंग डॉ. ले बोलवा सलाइन द्या लागन त्याले
प्रधान : टेंशन घेवू नका महाराज थे बिना खाण्यापिण्याचं महिनाभर राहू शकते
मोहन : तुम्हाले कसं माहीत?
प्रधान : हे पहा ना गुगलवर लिहलेलं आहेकृ
मोहन : अजुन काय काय लिहून आहे ढेकणेश्वराबद्दल? खाण्यापिण्याच काय लिहलं व्हेज आहे का नॉनव्हेज?
प्रधान : यात असं लिहलेलं आहे का हा..(मोहन त्याच्याकडे बघतो) हे फक्त जीवंत प्राण्याचे रक्त पिउन आपला
उदरनिरवाह भागवतो
अंडेरवार : कठीण रायते ते
शाहिर : काय?
अंडेरवार : उदरनिरवाह!
पंडित : महाराज! ढेकणेश्वराला माझ्या स्वाधिन करा माझं रक्त देतो
मोहन : पंडितजी…
पंडित : महाराज, संस्कृति, प्रथा, परंपरा जपण्यासाठी मी माझ्या रक्ताचा सडा टाकायला तयार आहे. माझं रक्त व्यर्थ नाही चालंल माझ्या रक्ताने राष्ट्रीय कीटक, राजघराण्यातील सभासदाला जीवणदान देण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे!!!
मोहन : पंडितजी मले तुमचा अभिमान आहे….(बाहेर नाऱ्यांचा, जयघोषांचा आवाज येत आहे) कशाची गबड
आहे काय गोंधळ आहे?
सिंग : (विंगेतून धावत येतो) आपल्या राज्याचा नविन राजा पिंटूजी ने निवडला
(सगळे उत्साहात नाचत सुटतात मोहन तोंडपाडून उभा आहे)
————(अंधार)———-
लेखक- अंकुर विठ्ठलराव वाढवे
[email protected]

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *