Breaking News

राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यानों, “हीच ती वेळ, करुन दाखविण्याची” ज्येष्ठ राजकिय पत्रकार योगेश त्रिवेदी यांचा खास लेख

लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा तसेच शिक्षक, पदवीधर आदी निवडणुकीत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मतदारांची मतदानासाठी घरोघरी जाऊन विनवणी करतात, मिनतवाऱ्या करतात. मतदार हा तेंव्हा राजा असतो आणि तो आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्यातील जनतेला कोरोना आजाराच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी घरातच रहा, असे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवडे म्हणजे १४ एप्रिल २०२० पर्यंत टाळेबंदी जारी केली आहे. देशातील १३० कोटी लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर लगेचच लोकांनी बाजारात गर्दी केली. कारण २४ मार्चच्या मध्यरात्री नंतर संपूर्ण देशात टाळेबंदी होणार होती. आता तीन महिने काही खरं नाही, असं लोकांना वाटलं. साहजिकच आहे. लोकांनी जर घराबाहेर पडावं असं व्हायला नको असेल तर उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारने त्या त्या राज्यात जनतेला जीवनावश्यक वस्तू विनामूल्य घरपोच देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्या राज्यात लोकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचे महाभयानक संकट परतवून लावावे यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांनी आपापल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना सर्वच नागरिकांची माहिती आहे. कारण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्येच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे “हीच ती वेळ आहे, करुन दाखविण्याची” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्षरशः द्रुष्ट लागण्यासारखे झपाटून काम करीत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मुंबई इस्पितळात स्वतः ची आई अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांनाही महाराष्ट्रातील बारा कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी वहात आहेत. अशा वेळी सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात. लोकांना फुकट नकोय, पण वेळेवर हवंय, ते जर घरच्या घरी मिळाले तर लोकं घराबाहेर पडणार नाहीत.

करुन दाखवलंत नां तर त्यांच्या लाखमोलाच्या आशीर्वादाची “शिदोरी” आपल्यागाठीशी निश्चितच जमा होईल. हां, आणखी एक महत्त्वाचे म्हणजे लोकांना जशा हक्कांच्या जाणीवा आहेत नां तशा त्यांनी कर्तव्यांच्या जाणीवासुद्धा अंगिकारण्याची गरज आहे. २२ मार्चला संध्याकाळी जे घडले तो एक उतावळेपणा आणि पर्यायाने हिडीसपणा, चीड आणणारा प्रकार होता. सरकार आपल्या साठी एवढं करतेय नां ? मग सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची जबाबदारी आपली आहे. आपली मानसिकता आपण बदलली नाही नां तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने टाळेबंदी चा कालावधी वाढवावा लागेल. नागरिक सूज्ञ आहेत, पण तो सूज्ञपणा कृतीतून दाखवून देऊ या.

सर्वांना मनापासून शुभेच्छा !

Check Also

२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *