Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला अखेर यश: १८ वर्षावरील सर्वांना लस पंतप्रधान मोदींचे मानले आभार, १ मे पासून लस मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची लस १८ वर्षावरील सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वप्रथम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आणि पत्राद्वारे केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवित सर्व वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासंदर्भात सूचना केल्यानंतर अखेर या मागणीची अंमलबजावणी १ मे पासून करण्यास पंतप्रधांनी मंजरी दिली.

दरम्यान, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात आढळून येत असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव यावेळी प्रौढ, ज्येष्ठ नागरीकांबरोबरच तरूण आणि लहान मुलांमध्ये होत असल्याचे अभ्यासांअंती पुढे आले. त्यामुळे कोरोनावरील लस ज्येष्ठ आणि प्रौढ व्यक्तींबरोबरच तरूणांनाही देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

तसेच शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने तरूण वर्ग सर्वत्र फिरत असतो. यापार्श्वभूमीवर या तरूणाचा जीव सतत धोक्यात राहतो. त्याचबरोबर एखाद्यावेळी त्यास कोरोनाची लागण झालेली असेल त्याच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त निर्माण होते. त्यामुळे तरूणांना लस दिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल तसेच त्यांचे प्राण वाचतील अशी मागणीही त्यांनी केली होती.

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *