Breaking News

आश्चर्य, पवारांसारखा ज्येष्ठ नेताही शेजारच्या देशाबद्दल चांगल बोलतात पाकिस्तानच्या स्तुस्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांवर टीका

नाशिकः प्रतिनिधी
निवडणूकांमध्ये मते मिळावीत यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही शेजारच्या देशाबद्दल चांगले बोलत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश आणि जगाला माहित आहे की, दहशतवादाचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे कुठून येतात. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य वाटत असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा महासमारोप करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, माजी खासदार उदयनराजे भोसले, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेक मंत्री पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांच्या सरदाराची सातारा पगडी घालून सन्मान केला.
संसदीय लोकशाहीत विरोधक असणे गरजेचे आहे. विरोधकांनी पंतप्रधान म्हणून माझ्यावर, सरकारवर टीका करावी मात्र राष्ट्रहितासाठी एकत्र यावे. परंतु विरोधक राष्ट्रहिता करीता विरोधक एकत्र येत नाहीत. उलट शत्रु राष्ट्राला उपयोगी पडतील असे वक्तव्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
जम्मू आणि काश्मीर, लडाखबाबतही विरोधकांनीही अशीच भूमिका घेत तेथील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी बुलेट प्रुफ जॅकेटची आवश्यकता होती. मात्र काँग्रेसच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु भाजपाचे सरकार आल्यानंतर १ लाख ६५ हजार बुलेट प्रुफ जॅकेटची खरेदी केली. तसेच हे जॅकेट देशात तयार करण्यासाठी प्राधान्य दिले. या बुलेट प्रुफ जॅकेटची निर्मिती सध्या देशात करण्यात येत असून त्याची १०० हून अधिक देशांना निर्यातही केली जात असल्याने जगातील निवडक देशाच्या यादीत भारताचा समावेश झाल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला सशक्त बनविण्याच्यादृष्टीने सैन्य दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सची खरेदी केली असून लढाऊ राफेल विमानांची खरेदी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी महाराष्ट्रात स्थिर सरकार नव्हते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट बहुमत नसतानाही पाच वर्षे स्थिर सरकार दिले. स्थिर सरकारमुळे राज्यात विकास, आर्थिक उन्नती आदी गोष्टी घडल्याचे पाह्यला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेतही फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा सलग मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम मोडतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अयोध्येतील राम मंदीराच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील काही बडबोले लोक उगाचच अयोध्येत जावून वल्गना करत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आदींची भाषणे झाली.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *