Breaking News

राजा आणि मोर… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

आटपाट नगरात एक राजा राहायचा. हा राजा बरीच वर्ष जंगलात राहिला, असं त्याचं म्हणणं. पुराव्यासाठी बरेचसे फोटो त्याने प्रजेपुढे ठेवले. प्रजेने विश्वास ठेवला आणि राजाने आपला फोटो वॉट्सअप डीपी ठेवला. राजा खरंच जंगलात होता का यावर शंका उपस्थित करणाऱ्यांचे राजाने राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना इतर प्रजेपेक्षा नेहमी अपमानकारक वागणूक दिली. राजा राज गादीवर बसण्यापूर्वी आपण जंगलात साधू म्हणून हिंडलो आणि गादीवर बसल्यानंतर आपण फकीर असल्याचा दावा करत, राज्यातल्या सर्व जाती धर्माची आपल्याला सहमती मिळवली.

राजा वाल्मिकीचा अवतार स्वतःला मानानं सुरु केलं. राज्यात नवनव्या कथा रचायला सुरुवात केली. लोकांच्या मेंदूला कुंपण घातलं. लोकांनी आपआपसात विभक्त करून त्यांना त्यांचं वेगळेपण दाखवून देऊन एका समूहाला आपलंस केलं. जवळ केलेला समूह हा हे पूर्ण राज्य आपलं आहे आणि राजा आपला आहे असं गर्वाने दूर केलेल्या समूहाला जाणवून देऊ लागले. मुळात जवळ गेलेला समूह हा राजाचा गुलाम बनला. राजाला विरोध करणाऱ्या समूहाला व्यक्तीला राजद्रोही म्हणून शिक्षा करण्यात आली. राजाला कोणीच प्रश्न विचारलेलं आवडायचं नाही. राजाने आपल्या महालात माणूस सोडून सगळे प्राणी पाळले. राजा एकदा असाच लिहिलेल्या खोट्या कथांची जुळवा जुळव करत असताना एक शिपाई आला शिपायाने प्रधानाकडे निरोप दिला, प्रधान धावत धावत राजाकडे आला आणि राजाला म्हणाला ” महाराज आपल्या राज्यात एक मोर आलाय तुमच्या बद्दल अनेक गोष्टी उघड उघड बोलू लागलाय ” राजा एकदम स्तब्ध झाला, त्याच्या मेंदूच्या नसा अचानक फाटल्यासारख्या झाल्या.

राजा प्रधानाला घाबरत घाबरत विचारू लागला.

राजा, ” प्रधानजी मोर काय काय बोलतोय “?

प्रधानजी ” मोर बोलतोय की तुम्ही जंगलात असताना जंगलात असंख्य दंगली घडवल्यात. जंगलात पेटवलेल्या आगीत असंख्य पक्षी, गाभण प्राणी जळून खाक झालेत. जंगलाचं नरक बनवून हा आता माणसा माणसाची राख करून आता या राज्याची राख करण्यासाठी आला आहे.”

एवढं ऐकल्यानंतर राजा खवळून उठला. त्या मोराला जिवंत पकडण्याचे आदेश दिले. तोपर्यंत मोराने राज्यभर राजाचे जंगलातले काळे धंदे राज्यभर गायले. राजाला आपला आणि आपण राज्याचे समजणारा समूह आता राजाच्या विरोधात हळूहळू स्वर काढू लागला. प्रधानाने मोराला मोठ्या शिथापीनें पकडून राजासमोर हजर केलं. राज्याने मोराला काहीही खायला न देण्याचे आदेश दिले आणि एका मोठ्या पिंजऱ्यात कैद केलं. राजाने तारीख जाहीर केली की या या दिवशी मोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे, तेंव्हा राज्यातील माझ्या बाजूने असणाऱ्या आणि मोराच्या खऱ्या खोट्यात येऊन विरोध करणाऱ्यांना जनतेने मोराचे मनोगत ऐकण्यास उपस्थित राहावे. मोराला राजाने जवळ जवळ आठवडाभर खाण्या पाण्याशिवाय ठेवले. मोर हळू हळू विसरू लागला आपण कशाला आलो. शेवटी तो दिवस उजाडला लोकांसमोर मोराला आणलं गेलं, मोराला चालता येत नव्हतं. राजा आपल्या हातात दाणे धरून मोराच्या दिशेने हात फैलाऊन सिंहासनावर बसला. मोराने पाहिलं मोराने होती तेवढी शक्ती एकवटवली आणि राजाच्या हातांच्या दिशेने धावला आणि अधाशासारखा राजाच्या हातातले दाणे टिपू लागला. पोटभर दाणे खाल्ले, वाडग्यातलं पाणी प्यायला, इतक्यात प्रधान म्हणाला आता मोर आपलं मनोगत व्यक्त करेल. मोराने सगळीकडे पाहिलं आणि एकच  म्हटलं ” राजा हा चांगला माणूस आहे “. इतक्यात जमलेल्या प्रजेने मोराने राजाबद्दल घाणेरडी अफवा पसरवून राजा आणि प्रजेत फूट पडल्या बद्दल मोराला फाशी द्यावी, ” अशी जोर जोरात मागणी केली. प्रजेचा विश्वास मिळवण्याची हीच खरी संधी हे समजून राजाने मोराला फासावर चढवलं.

आता राजा थोडा घाबरून आहे. जंगलातून अजुन कोणी आपल्या काळ्या धंद्यांचे पाढे  वाचणारे येणार तर नाही ना, या भीतीने राजा आता घाबरून आहे. जंगलाची भीती बाळगून आहे. एखादा विद्रोहीं मोर येऊन प्रजेला आपल्या विरोधात तर उभं करणार नाही ना या भीतीने राजाच्या डोक्यावरचे केस हळू हळू कमी होत जात आहेत.

Check Also

न्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा

गावांत  कोरोनाची  बातमी  अचानक  गायब  झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *