Breaking News

पवार-मोदी यांची भेट पूर्वनियोजितच: “तशी” बैठक झालीच नाही फडणवीस-पवार भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिर असण्यावरून आणि भाजपाच्या विविध राजकिय आक्रमक खेळ्यामुळे गोंधळाची परिस्थिती असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्क विर्तकांना उधाण आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रश्नी पत्रकार परिषद घेत खुलासा केला.

राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे घेतलेली भेट पुर्वनियोजित होती. तसेच या भेटीची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांना होती अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठक वगळता अन्य कोणासोबतही शरद पवार यांची बैठक झाली नसल्याचे सांगत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोणतीही अशी बैठक झाली नसल्याचे सांगत या उलट सुलट बातम्या मुद्दाम चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवारसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करु असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर आज प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बँकिंग रेग्युलेटरी कायद्यात नवीन बदल केल्याने जे लोक बँकांकडून कर्ज घेतील, त्यांना बँकेचे अडीच टक्के शेअर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्ज परत केल्यानंतर हे शेअर कुणालाही विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला देण्यात आला नाही असे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहेत. यापुर्वी हे शेअर बँकेलाच पुन्हा देण्याचा नियम होता. मात्र अशापद्धतीने खुल्या बाजारात शेअर विकल्यास सहकारी बँक धनाढ्य लोकांच्या हातात जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा येत आहे. तसेच त्यांचा व्याजदरही अबाधित राहत नाहीत अशाप्रकारचे लेखी निवेदनातून शरद पवारसाहेबांनी हे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या चर्चेतून केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर शुक्रवारी आणखी दोन बैठका झाल्या त्याबद्दलची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात झाली त्याबद्दल पियुष गोयल यांनी स्वतः शरद पवारसाहेबांची त्यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे. सभागृहात सर्व पक्षांचे सहकार्य मिळण्यासाठी अशा भेटी होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहातील कामकाजात सहकार्य करेल अशी चर्चा यावेळी दोघांमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच देशाचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीला माजी संरक्षणमंत्री म्हणून शरद पवार उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सरंक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि लष्करातील प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. देशाच्या सीमेवरील परिस्थितीचे आकलन उपस्थितांना करुन देण्यात आले. त्यानंतर राजनाथसिंह यांनी माजी सरंक्षणमंत्री म्हणून शरद पवारच्या अनुभवाचा विचार करता काही सूचनाही घेतल्या. या तीन बैठकांखेरीज इतर कोणाबरोबरही पवारची बैठक झालेली नाही. माध्यमात ज्या काही उलटसुलट बातम्या येत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अशा विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली असून इथे डाकू पण साधू होवू शकतो – नवाब मलिक 

भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली आहे. इथे डाकू पण साधू होवू शकतो असा जबरदस्त टोला त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लगावला.

नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परेल येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता. त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले होते. म्हणजे ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे. त्यांच्या पक्षात गेल्यावर चौकशा बंद होतात. ही सत्य परिस्थिती आहे. नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते याची आठवण त्यांनी करुन दिली.

शरद पवारांनाही ईडीची नोटीस आली होती. मात्र ती परत घेण्यात आली. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केली. त्यामुळे आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटीसीला आणि कारवाईला घाबरणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

आमचे नेते ज्या एजन्सीने कारवाई केलीय त्यांना सहकार्य करत आहेत. आमच्या नेत्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. मात्र केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग केला जातोय. या चौकशा थांबवा हे सांगण्यासाठी आमचा कोणताही नेता मोदी-शहा यांची भेट घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

भाजपाच्या ५व्या यादीत महाराष्ट्रातील तीन जणासह १११ जणांची उमेदवारी जाहिर

भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली असून या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *