मुंबईः प्रतिनिधी
गुजरात निवडणूकांचा निकाल जाहीर व्हायच्या आधीच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. मात्र पटोले यांचा राजीनामा म्हणजे भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीन धोरणांचा परिपाक असून भाजपलाच हा घरचा आहेर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते फुटल्याची शक्यता व्यक्त करत त्याचे खापर काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर फोडण्यात आले. काँग्रेसच्या या आरोपाचा खुलासा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकिय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेबाबत काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. परंतु विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे सध्या तुरूंगात असलेले आमदार रमेश कदम यांचे मत माने यांना मिळाले नाही. तर छगन भुजबळ यांनी मतदानच केले नाही. या दोन मतांशिवाय ३९ मते आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या सत्तेवर भाजपबरोबर शिवसेनाही सहभागी आहे. मात्र त्यांचे मंत्री मंत्रिमंडळात बसून कोकणातील रिफायनरीजला पाठिंबा देतात आणि बाहेर येवून त्याला विरोध करतात. केंद्रात, राज्यात शिवसेनेचे कोकणातील मंत्री आहेत. हा रिफायनरी प्रकल्प आणण्यात त्यांचाच पुढाकार आहे. परंतु आता त्यास तेच विरोध करत असल्याचे दिसत असून त्यांच्या इतका दुटप्पीपणा आतापर्यंत पाहीला नसल्याची टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.
Check Also
“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची …