Breaking News

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी

गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आणि राज्य व केंद्र सरकारच्या कारभारवरून भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सातत्याने टीका सुरु केली होती. मात्र त्याची दखल भाजपश्रेष्ठींकडून घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी कंटाळून भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत घरवापसी अर्थात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून त्यांना काँग्रेस पक्ष संघटनेत चांगले पद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या ९ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र या पहिल्या टप्प्यात भाजपला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपला फारशा जागा मिळण्याची शक्यता दस्तुरखुद्द भाजपलाच वाटेनाशी झाली आहे. तशी पुन:रावृत्ती विदर्भात होण्याची शक्यता असल्याने विदर्भात काँग्रेसला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. त्याधर्तीवर विदर्भातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याने नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाल संपत आल्याने त्यांच्या ठिकाणीही नव्या काँग्रेस नेत्याची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना राजकिय ठक्कर देईल असा तगडा उमेदवार कॉंग्रेसकडे नव्हता. मात्र आता पटोले यांच्या निमित्ताने कॉंग्रेसला पु्न्हा एकदा चांगले नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत असून ते लवकरच काँग्रेसच्या प्रचारार्थ गुजरातमध्ये फिरणार असल्याचे काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दिल्लीत रंगली असून त्यांचा भाजप प्रवेश झाल्यास नाना पटोले यांचा पुढील लोकसभा निवडणूकीत पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पटोले यांनी आताच काँग्रेसची वाट धरण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *