Breaking News

आणि पंकजा मुंडेकडूनही धनगर समाजाची फसवणूकच

पाय न ठेवण्याच्या घोषणेला २४ तास उलटायच्या आतच पंकजा मुंडे मंत्रालयात हजर

मुंबई : प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. तरी त्या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केली. पंरतु त्यास २४ तास पूर्ण व्हायच्या आतच मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात पाऊल ठेवले. परंतु धनगर समाजाचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तसे आपण बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिल्याने धनगर समाजाच्या नशीबी पुन्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

नांदेड इथल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेत लाखो धनगर बांधवांसमोर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी, जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही. तो पर्यंत मंत्रालयातील दालनात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केली. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित रहात धनगर समाजाला दिलेला शब्द फिरवत त्या समाजाची फसवणूक केली.

दरम्यान पंकजा मुंडे या मंत्रालयात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मंत्री मुंडे यांनी लोकांची कामे कोण करणार मी परत जावे का ? असा प्रतिप्रश्न करत धनगर समाजाच्या सभेत मी असे बोललेच नसल्याचा खुलासा वडकुते यांच्यासमोर करण्याचा प्रयत्न केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडताना माध्यमांनी त्यांना त्यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता पंकजाताई म्हणाल्या की, माळेगावच्या यात्रेत मी म्हणाले की ,२०१४ साली धनगर समाजाच्या पाठिंब्यावर आपले सरकार स्थापन झाले आहे. त्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पुन्हा आम्ही  सत्तेत येऊ शकणार नाही. आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात आम्हाला बसता येणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच मी मागासवर्गीय, शोषित पीडित समूहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मंत्रालयात आल्या शिवाय त्यांच्या बाबत मी काम कसे करू शकते ? असा प्रतिसवालही त्यांनी प्रसारमाध्यमांना केला. 

दरम्यान मंत्रालयात येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी धनगर समाजाला केवळ पोकळ घोषणा देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. मंत्री पंकजाताई यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाळ्याशिवाय मंत्रालयात येणार नाही असे वृत्त सर्वत्र छपवून आले आहे . असे जर असेल तर त्यांनी जनतेला फसवू नये.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *