Breaking News

भक्तिमय शक्तिमय सावरगाव !! ना.पंकजाताई मुंडे यांच्या शब्दात भगवान बाबांचे महात्मे

गेले अनेक वर्षे झुंज देणे , प्राणपणाने सामना करणे हे माझ्या सवयीचे झाले आहे ! ‘संघर्ष’ शब्द टाळला कारण तो आता कोणिही वापरतं !! पण हजारो लाखो लोक काय म्हणतात हे ऐकण्याची पद्धत काय ,त्याची मानकं काय ???लोकांची भाषा समजावून सांगणारा ट्रान्सलेटर कोण ?? …लोकांचे कान, लोकंच शब्द, लोकांच परिणाम आणि परिमाण ..
हळदी कुंकू ठेवलं तर लुटायला आणलेली वाणाची वस्तू संपत नाही, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्ती लोक येत नाहीत असं गृहिणीचं होतं.. जास्तीचं तर सोडा अपेक्षित ही येत नाहीत असाचअनुभव येतो ….मग काय जिथे लोक एक शब्दावर, एक हाकेवर, हजारो नाही लाखोंच्या संख्येनी येतात तिथे भक्ती तरी पाहिजे किंवा शक्ती तरी !! तसाच भक्ती शक्तीचा अनुभव एकत्र घ्यायचा असेल तर एवढ सोप नाही ते.. त्याला भाग्य लागतं !! हे भाग्य जन्माला आल्यापासून मला लाभलं मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला खूप मोठा भाग्याचा विषय …त्यांच्या वारसात मला लोकांचे प्रेम व भगवान बाबांची भक्ती मिळाली.. मुंडे साहेबांची भक्ती आणि बाबांची शक्ती ही अवर्णनीय !!
आज त्यांचे एकमेकांबरोबर नाते ही कल्पनेच्या पलीकडले आहे ..सूर्यापासून किरणं ,फुलापासून सुगंध जसा विलग करता येत नाही तसाच भक्ती शक्तीचा अनुभव आहे …सूर्य किरणांमुळे का किरण सुर्यामुळे कसं सांगता येईल ? फुलं सुगंधा मुळे का सुगंध फुला मुळे कठीण प्रश्न आहे! भक्त मोठा का दैवत? …विठोबाला विचारा ज्यांनी भक्ताच्या घरी पाणी सुद्धा भरलं, शिव्या देखील खाल्ल्या …भक्ती मुळे भक्त का भक्तामुळे दैवत .. खरा भक्त म्हणेल दैवतामुळे मी ! आणि खरं दैवत म्हणेल अरे भक्त नाही तर माझा अर्थ काय ?…
भक्ती आणि शक्तीचा योग्य समन्वय लोकांना ऊर्जा प्रेरणा आणि आशा देतो …ऊस तोडणाऱ्याच्या कोयत्याला धार, गरीबाच्या स्वप्नाला आधार देतो ..हेच मिळतं ना दसऱ्याला ? आपल्याला ,मला आणि तुम्हाला?? माझ्या भगवान बाबांच्या दर्शनाने व मुंडे साहेबांच्या भाषणातून इतकी ऊर्जा घेऊन जात होते लोक ती ऊर्जा त्यांच्याकडून हिरावून घेणे अशक्यच…ही अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झालाच..हे उध्वस्त करण्याचा डाव ही आखला गेला पण कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा मी नवा डाव मांडून माझ्या लोकांना सुरक्षित व शांत ठेवणे मला क्रमप्राप्त वाटले. आपले शब्द दूषित करून कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली..
जर हा भक्ती शक्तीचा संगम माझ्या साक्षीने, माझ्या अर्घ्य देण्याने होणार ,केवढी जबाबदारी??? मी थेंबासाठी ओंजळी पुढे केली पण सर्व जन’सागर’ लोटला माझ्या ओंजळीत..कुठे फेडू हे उपकार जनता जनार्धनाचे ..भगवान बाबाही मिळावे आणि भक्तही आनंदी राहवे असं कसं करता येईल का विचार करत राहिले ..लोकं म्हणतात मेळावा हवाच..माझं मन म्हणतं भगवान बाबा हवेच..या प्रचंड अस्वस्थेतून या असह्य तगमगीतून मला बाबांनीच बाहेर काढलं ..माझ्यासंगे बाबाही सावरगावात आले असा भास मलाच नाही लाखोंना झाला …
गरिबांचा मेळा वंचितांना लळा, एक सीमोल्लंघन,माझं ,भक्तांचं आणि भगवान बाबांचाही !! कष्ट आणि स्वाभिमानाचं व्रत घेऊन , समाज उत्थान करण्याचे दिव्य स्वप्न अंगी धारण करून सीमोल्लंघन करून घेऊ ..मग बोलुन गेले मागच्या दसऱ्याला भाषणात “बाबांची पाण्यावर तरंगणारी मूर्ती साकारणार “…लागलो सर्व कामाला…बघा आता हा जगनाथाचा रथ तुमच्या अनेकांच्या अंगुली स्पर्शाने पार पडला…
आणखी एक वर्षात या जागेच रूप अत्यंत शांतीदायी व शक्तीदायी होईल ..भगवान बाबांची शांत मूर्ती आपल्यातील दाह कमी करेल व त्यांचा करारी बाणा आपल्याला ताकत देईल …लोकांत भिंती बांधून शक्तीशाली होण्यापेक्षा लोकांना अध्यात्मिक व व्यवहारिक कर्तव्यदक्ष करणे व संवेदना देणे हिताचे आहे ते करूया. “बैसुनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी” ..हे मोहक पण शक्तिशाली रूप बघून सीमोल्लंघन करूया …दसऱ्याला, तुमच्या ,माझ्या, आपल्या दसऱ्याला आपली परंपरा निभाऊया !!! ..
आपल्या भगवान बाबांच्या जन्म गावी आपल्या सावरगावात !!! बघा तयारी जोरात चालू आहे …!!!

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *