Breaking News

पंढरपूर- मंगळवेढ्याला जायचाय मग यापैकी एक गोष्ट सोबत ठेवा नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

मुंबई : प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे मतदान १७ एप्रिल २०२१ ला होत आहे. राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

१३ एप्रिल २०२१ च्या सरकारी आदेशानुसार १६ एप्रिल २०२१ च्या संध्याकाळी ६ पासून ते १८ एप्रिल २०२१च्या रात्रीच्या १२ वाजेपर्यंत कोणत्याही वाहनाने वैध ओळखपत्र धारक किंवा मतदारयादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा घेऊन प्रवास करणाऱ्यास प्रवास वैध समजून परवानगी द्यावी. ब्रेक द चेन शीर्षासह १३ एप्रिल २०२१ या दिवशी काढलेल्या सरकारी आदेशांमध्ये निर्देशित केलेल्या बंधनात राहून असा प्रवास करण्यास संबंधित मतदारांना परवानगी द्यावी. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. तर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. आवताडे यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या. तर भगीरथ भालके यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी जाहिर सभा घेतल्या.

या दोन्ही उमेदवारांसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भलतीच प्रचाराची राळ उडविल्याने पोट निवडणूक चांगलीच रंगली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भारत नाना भालके यांच्या कामाची वाहवा करत आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनता कोणाला मत देणार हे लवकरच कळून येणार आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *