Breaking News

समाजाच्या वेलीवर फुटलेली सहृदयाची “पालवी” मंगल शहा एक धीरोदात्त आधारछाया

एच आय व्ही (एड्स) हा समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्न. एचआयव्हीच्या अज्ञानातून पदरी उपेक्षा आलेल्या बालकांना स्मशानभूमी, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचराकुंडी अशा ठिकाणी सोडून दिले जाते. या बालकांना सांभाळण्यासाठी मंगल शहा यांनी पंढरपूर येथे पालवी संस्थेची स्थापना केली. पंढरीला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घ्या, कैकाडी महाराजांचा मठ पहा; पण त्याच बरोबर पालवीच्या आनंदवनाला मात्र जरुर भेट द्या. कारण, पालवी म्हणजे ममत्व, पालवी म्हणजे वात्सल्याचा झरा, पालवी म्हणजे निराधारांसाठी आपुलकी, पालवी म्हणजे अरुणोदययाचा मंगल आशिष आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋृतुंबरोबरच एका ऋृतुचे वरदान पालवीला लाभले आहे. त्याचे नाव जिव्हाळा.
पंढरपूरमध्ये मंगल शहा यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यास सुरवात केली. १९७८ चा तो काळ. त्याकाळात कुष्ठरोग्यांना समाजाकडून अत्यंत वाईट वागणूक दिली जायची. घरातली सख्खी माणसं त्यांचा जाच करायची. त्यांना तुसडेपणाची वागणूक द्यायची. मग, समाजाकडून तरी या कुष्ठरोग्यांनी काय अपेक्षा धरावी? जिथे जातील तिथे त्यांची अवहेलनाच होत होती. त्यांच्याबरोबर स्पर्श सोडा, साधं बोलणंही माणसं टाळायची. सरकारी दवाखान्यातही या कुष्ठरोग्यांना ड्रेसिग करायला कर्मचारी धजावत नसत. अशा परिस्थितीत मंगल शहा यांनी त्या कुष्ठरोग्यासाठी काम करायला सुरवात केली. सोबतच रिमांड होममधील मुलींना आंघोळ घालणे, त्यांची वेणी फणी करणे, संस्कार वर्ग घेणे ही कामेही सुरुच होती. वेश्यावस्तीतील मुले, झोपडपट्टीतील मुले यांच्यासाठी प्रभातफेऱ्या काढून समाज प्रबोधन करतच होत्या. साधारण १९९९ पर्यंत त्यांचे हे सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु होती. १८ वर्षांपूर्वी जेव्हा एचआयव्ही बद्दल बोलणेही पाप होते, त्या काळात वेश्यावस्तीमध्ये जाऊन प्रबोधन करणे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या लेकरांचा सर्वतोपरी सांभाळ करणे. हे शिवधनुष्य मंगल शहा यांनी पेलले.
२००० मध्ये मंगल शहा यांना जनावरांच्या गोठ्यात दोन मुले सापडली. ती अनाथ मुले पाहून त्यांच्या मनात मायेची पालवी फुटली. नातेवाईकांनी वाळीत टाकलेली, गुरांच्या गोठ्यातील एचआयव्हीबाधित बालके नजरेस पडली आणि प्रबोधनाची जागा सक्रिय हाताने घेतली. आतापर्यंत केलेल्या कामामुळे त्यांना पंढरपूरमध्ये बाई या नावानं ओळखलं जात होतं. या बार्इंनी त्या मुलांचा सांभाळ करायचा ठरवलं. स्वतःच्या घरी आणून त्यांचा सांभाळ म्हणजे घरी आणि आजूबाजूला सुरुंग लावण्याचा प्रकार होता. चमचमत्या आकाशात ताऱ्यासारखे मिरवायला सारेच उत्सुक असतात. पण फाटलेले आभाळ कोण डोक्यावर घेणार? हे फाटलेलं आभाळ मंगलताईनी डोक्यावर घेतले. या कामात त्यांची १० वर्षांची मुलगी डिंपल आणि आशिष, राजेश ही दोन मुले सोबत होतीच.
एड्सग्रस्त बालकांना माया, प्रेम, जिव्हाळा, योग्य आहार, औषध उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यांचा तो हक्क मिळवून देण्यासाठी मंगल शहा यांनी ‘‘पालवी संगोपन केंद्र प्रकल्प सुरु केला. पाहता पाहता पंढरपूरमध्ये पालवीत विशेष बालकांना सांभाळले जाते हे समजले आणि मुलांना पालवीत सोडण्याचा ओघ सुरू झाला. मग, जवळच जागा घेतली. पण जागा मालकाने या बालकांसह तेथे राहण्यास मज्जाव केला. पाणी बंद केले. घरून पाणी नेऊन संसार सुरू झाला. येणारी बालके जखमांनी लतपत असलेली, अर्धमेली असायची. डॉक्टर स्वतःच्या दवाखान्यात त्यांना घ्यायला उत्सुक नसायचे. मंगलतार्इंनी स्वतः ड्रेसिंगसहित औषधोपचार सुरू केले. बालकांना इतर शाळेत प्रवेश नाकारल्यावर शासनदरबारी असंख्य हेलपाटे घालून स्वतःची स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शाळा सुरू केली. दोन बालकांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात आज ११० बालके आहेत. संस्थेला जागा हवी होती. सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी समाजाला आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे पालवीला स्वतःची चार गुंठे जागा मिळाली. पालवीत बालकांना निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. इयत्ता १ ते १० मध्ये ७२ बालके शिकत आहेत. तर, १२ बालके महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. रोज एक नवीन आव्हान, रोज एक नवीन जबाबदारी. पण न थकता, न हरता, न थांबता चालत राहतो त्याला यश निश्चित मिळते. आज पालवीला मदत करणाऱ्या हातांमध्ये डॉक्टर, समुपदेशक तरुण वर्गाचा समावेश आहे.
पालवीमधील वयात आलेल्या, शिक्षण पूर्ण झालेल्या बालकांचे विवाह करून देण्याचे धाडस त्यांनी केले. या विवाहित दाम्पत्यांची अपत्ये पूर्णतः निरोगी आहेत. समाज त्यांना स्वीकारतो आहे. याशिवाय पालवीने विशेष असे सहा प्रकल्प सुरु केले आहेत. बालकांच्या सकस आहाराकरिता परमपूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा सुरू केली. या गोशाळेत पाच गाई असून मुलांच्या दूध, ताकाची गरज त्या भागवितात. मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गोमूत्र, अग्नी होत्र यांचा वापर सुरू केला. स्वतःची गोशाळा सुरू केली. निरोगी राहण्याकरिता योग्य उपचार सुरू केले. एचआयव्हीग्रस्त महिलांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन मंगला शहा यांनी आधार गट स्थापन केले. हा पालवीचा सेल्फ रिलायन्स प्रोजेक्ट. त्यामधून महिलांना शिलाई, शेतीकाम. प्लंबिंग, कागदकाम शिकविण्यात येते. कागद कामापासून ते गोधडीपर्यंत जवळपास ७० वस्तू तयार करुन विकल्या जातात.
बालकांकरिता पुस्तक वाचन, प्रेरणादायी फिल्म दाखवणे, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, विस्मृतीत गेलेले अनेक खेळ गाणी यांचा परिचय करून देणे हा पालवीचा आणखी एक उपक्रम. पालवीतल्या मुलांच्या ‘‘आम्ही प्रकाश बीजेड या नृत्य-संगीतात्मक व्यावसायिक कार्यक्रमाचे महाराष्टातून कौतुक होते. ज्याला गरज त्याला आसरा देऊ या पद्धतीने परितक्त्या मनोरुग्ण महिलांसाठी माहेर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत ७५ जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. तर, हिरकणी प्रकल्पात अत्याचाराने पिडीत कुमारी माता, मनोरुग्ण मातांचा सांभाळ केला जातो. बाळंतपणानंतर त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाते. समाजामध्ये भंगार/कचरा वेचणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. ही बालके भारताचे उत्तम नागरिक होण्याकरिता त्यांना सुसंस्कार देऊन शैक्षणिक प्रवाहामध्ये आणणे गरजेचे आहे. ही बालके व्यसनांमध्ये अडकू नये याकरिता सामाजिक जबाबदारी जाणून पालवीने पंढरपूर येथील वसाहतीमध्ये काम चालू केले आहे. सध्या येथे बत्तीस बालकांवर संस्कार चालू आहेत.
या सहा प्रकल्पांद्वारे पालवीचे काम नेटाने चालू आहे. मंगला शहा या सेवेला सतीचं वाण समजतात. सेवेला यज्ञ समजून फक्त मानवसेवेसाठी कार्य करण्याची वृत्ती त्यांच्या स्वभावात आहे. रक्तात आहे. हा त्यांचा वारसा त्यांची मुलगी डिंपल घाडगे आणि नातू तेजस घाडगे समर्थपणे पुढे चालवित आहेत. मंगल तार्इंची मुलगी डिंपल दहा वर्षांची असल्यापासून या कामात आईला मदत करत आहे. आता तर पालवीची संपूर्ण जबाबदारी डिंपल घाडगेच सांभाळतात. डिंपल तार्इंचा मुलगा तेजस याने मेडिकलमधून एमएसडब्ल्यु केले आहे. असं म्हणतात की मुलगा आई-बापाच्या वळणावर गेला आहे. पण, तेजस आजी-आईच्या वळणावर गेलाय. त्यालाही समाजसेवेची आवड आहे. एका निरक्षर पिढीने सुरु केलेलं काम सुशिक्षित पिढीने पुढे न्यायचे हे त्याचं तत्व आहे. तर, डिंपल तार्इंची मुलगी कोमल ही सायकोलॉजी विषय घेऊन बीए झालीय. तिनेही पालवीत मुलांबरोबर काम करायचं ठरवलंय. आजी, आईच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही पालवीत स्वतःचा प्ले ग्रुप सुरु केला आहे. आशिष आणि राजेश ही मंगल तार्इंची मुले सोबत आहेतच. आपलं घरदार सांभाळून संपूर्ण कुटूंबच्या कुटूंब नव्हे तर तीन या सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन काम करत असल्याचं हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव उदाहरण असावं.
आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये चांगल्या संस्थांचा, आदर्श व्यक्तिमत्वांचा शोध घेणं हे निरामय समाजाचं लक्षण आहे. सेवाव्रत स्वीकारलेल्या मंगलतार्इंसारख्या व्यक्ती स्वयंसिध्द आहेत. प्रशस्ती/मानपत्रापासून त्या दूर असतात. म्हणूनच समाजातील त्यांची कदर करणाऱ्या गुणवंतांनी त्यांची खरी पारख करुन त्यांच्या गुणांची, सेवावृत्तीची समाजाला ओळख करुन दयायची असते. त्याचाच हा एक प्रयत्न…

 

 

 

 

 

 

 

 

शब्दांकन-महेश पवार
पालवी
डिंपल घाडगे ९८६००६९९४९

Check Also

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *