Breaking News

प्रा. केंद्रे, महादेवन आणि कोल्हे दांपत्याला पद्मश्री प्रदान महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यक्रर्ते डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन या महाराष्ट्रातील मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांस पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात आठ मान्यवरांना पद्मभूषण तर ३९ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हे दाम्पत्याने ३४ वर्षांहून अधिक काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात गोरगरीब व वंचितांना आरोग्यसेवा प्रदान केली आहे. प्रसिध्द नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक तथा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना कला क्षेत्रातातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. केंद्रे यांनी सलग ३५ वर्ष नाट्यशिक्षण दिले आहे. तसेच, भारत व विदेशात प्रा. केंद्रे यांनी नाट्य प्रशिक्षण विषयक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे.
प्रसिद्ध गायक आणि संगीत संयोजक शंकर महादेवन यांनी कला क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. महादेवन यांनी आतापर्यंत विविध भाषांमध्ये ३ हजारांहून अधिक गीत गायले आहेत. महादेवन हे देश-विदेशात भारतीय शास्त्रीय संगीत, जाझ, फ्युजन, रॉक, लोकसंगीत, चित्रपट संगीत आणि भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर करीत आहेत.
गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ११२ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ११ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी ४ जणांना आज सन्मानित करण्यात आले. १६ मार्च २०१९ रोजी पुढच्या टप्प्यातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Check Also

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *