Breaking News

विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचे पुस्तक कशाला ? संघाशी निगडीत प्रकाशन संस्थेवर सरकारची मेहेरबानी असल्याचा विखे-पाटील यांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी

सरकार विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तके खरेदी करीत असून ही पुस्तके पौराणिक म्हणून घेतली, की धार्मिक म्हणून घेतली, की ऐतिहासिक पुस्तके म्हणून घेतली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत पंतप्रधानांची पुस्तके पौराणिक म्हणून घेतली असतील तर पुराणात त्यांचे नाव मी अजून तरी वाचलेले नाही. ऐतिहासिक म्हणून घेतली असतील तर त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशीही संबंध नसून विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांचे पुस्तक कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर केवळ शालेय विद्यार्थ्यांमध्ये भाजपचा प्रचार, या एकमेव हेतूने ही पुस्तके घेण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीत मोठा घोळ झाल्याचा आरोप असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक २० रूपयाला उपलब्ध आहे. तेच पुस्तक सरकारने चक्क ५० रूपयांत खरेदी केले असून या प्रकाशनाकडून तब्बल ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी करण्यात आली असून ही तर सरळसरळ भारतीय विचार साधनावर सरकारी मेहरबानी असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विखे-पाटील यांनी या पुस्तकांच्या खरेदीची पावतीच पत्रकारांसमोर सादर केली.

त्याचबरोबर पुस्तकांच्या खरेदीकरीता जुलै २०१७ मध्ये निविदा काढण्यात आली. सप्टेंबरमध्ये पुस्तकांची यादी जाहीर झाली. मात्र निविदा प्रक्रियेत घोळ असल्याची बोंब झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही यादी रद्द केली. त्यानंतर आता १२ जानेवारीला नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जुन्या यादीत संत कथा व ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवरील पुस्तकांचा भर होता. नव्या यादीत मात्र धार्मिक व पौराणिक पुस्तकांवर भर देण्यात आला आहे. तसेच यातील भाषा प्राथमिक शाळेतील मुलांच्या डोक्यावरून जाणारी आहे. या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो. पण या पुस्तकांमध्ये ‘कथा गणपती’सारखी एक-दोन पुस्तके सोडली तर उर्वरीत साऱ्या कथा चित्राविना आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोजड भाषेत लिहिलेल्या असल्याचा आरोप केला.

आता फक्त प्रश्नपत्रिकांवर फोटो छापून घेण्याचे शिल्लक राहिलेय!

राज्याचा शिक्षण विभाग कामासाठी कमी आणि लोकप्रिय व प्रसिद्धीभिमुख निर्णयांसाठीच अधिक प्रसिद्ध आहे. हा शिक्षण नव्हे तर ‘शायनिंग’ विभाग झाला असल्याची टीका करत शाळा इमारतीच्या दर्शनी भागात शिक्षण क्षेत्रातील महापुरूषांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे फोटो झळकवण्यात आले. जाहिरातबाजीसाठी या सरकारने शाळांनाही सोडलेले नाही. मागे विद्यार्थ्यांच्या कलचाचणी अहवालावर शिक्षणमंत्र्यांनी आपला फोटो छापून घेतला. आता फक्त प्रश्नपत्रिकेवरच यांची छायाचित्रे छापणे शिल्लक राहिले असल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली.

शिवसृष्टीला ३०० कोटी कशासाठी?

बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला ३०० कोटी रूपये देण्याच्या निर्णयावरही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला. मुळातच बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासाची मोडतोड केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे सरकारला शिवसृष्टी उभारायचीच असेल तर त्यासाठी इतिहास संशोधकांची एखादी उच्चाधिकार समिती नियुक्त करून त्यांच्या शिफारसीनुसार निर्णय घ्यावेत, असे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *