Breaking News

यंदाचा शिक्षक दिन साजरा होणार सोशल माध्यमांवर “Thanks A Teacher “ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, रविद्रनाथ टागोर यांच्यासह माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त यंदा “Thanks A Teacher” हे अभियान सोशल मिडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे शाळांमध्ये उपस्थित राहून यंदाच्यावर्षी शिक्षक दिन साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे सोशल माध्यमाच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल साईटवर शिक्षकांबद्दलची भावना विद्यार्थ्यांना व्यक्त करता येणार आहे. “फेसबुकवर thnxteacher, ट्विटरवर @thnxteacher आणि इंस्टाग्रामवर @thnkuteacher” हे अभियान राबविले जाणार आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा वापर शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे फोन किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही अशा विद्यार्थ्यांच्या घरी जावून शिक्षक शिक्षण-ज्ञानदान करत आहेत. शिक्षण देणाऱ्या शिक्षकांबद्दलची भावना विद्यार्थ्यांना या सोशल माध्यमवर व्यक्त करता येणे शक्य होणार आहे.

शिक्षक दिनाचे महत्व लक्षात घेवून आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद शिक्षण सुरु या विषयावर यशस्वी ऑनलाईन शिक्षणाचा फायदा किंवा त्याच्या यशोगाथावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडता येणार आहे. तसेच या गोष्टी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले.

याशिवाय कोविड-१९ काळातील शिक्षणावर परिसंवाद-वेबनारच्या माध्यमातून शाळांना परिसंवाद आयोजित करून त्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना सहभागी आयोजित करावेत.

या दिनानिमित्त वकृत्व, निंबध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश देत यात विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही सहभागी करण्याचे निर्देश शालेय विभागाने शाळांना दिले.

तसेच मी कोविड योध्दा या सदराखाली केलेल्या कामाचे अनुभव कथन संबधितांनी करत त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. याशिवाय शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुशोभन स्पर्धा आयोजन करणे, शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण करणे, शिक्षक असलेले परंतु सध्या उच्च पदावरील व्यक्तींच्या मुलाखती घेणे/ स्वत: व्हिडीओ तयार करून पाठविणे आदी अभियान राबविताना माझे प्रेरक शिक्षक या विषयावर प्राधान्य द्यावे जेणेकरून शिक्षकांमध्ये प्रोत्साहन वाढीस लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमात स्थानिक लोकसभा-राज्यसभेचे खासदार, विधान परिषद आणि विधानसभेचे आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *