मुंबईः प्रतिनिधी
राज्यात लॉकडाऊन लागू करण्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही त्यात सूर मिसळत लॉकडाऊन लागू करण्यास विरोध दर्शविला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळीच भूमिका जाहिर करत लॉकडाऊनवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच विसंवाद असल्याचे चित्र आज पहिल्यांदाच पाह्यला मिळाले.
राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला दोन वेळा आवाहन करत कडक निर्बंध लागू केले. परंतु तरीही नागरीकांकडून कडक निर्बंधाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी करण्याचे आदेश प्रशासनाना नुकतेच दिले. त्यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जर राज्यात लॉकडाऊन जाहिर केला तर त्यास आमचा विरोध राहणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला.
त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही महाविकास आघाडीत असूनही लॉकडाऊन लागू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक नसल्याचे जाहिर केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
मात्र पंढरपूर येथे भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांनी मांडलेल्या भूमिकेशी नेमकी विसंगत भूमिका मांडत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निर्णय घेत आहेत. ते आम्हा दोन्ही पक्षांना विश्वासात घेवून भूमिका घेतील असे स्पष्ट करत एकप्रकारे लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
