Breaking News

ओखी वादळामुळे मुंबईच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकणात पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी

अरबी समुद्रातून मुंबईहून गुजरातच्या दिशेने रवाना होत असलेल्या ओखी वादळामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकणात काल संध्याकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी हलक्या स्वरूपात कोसळणाऱ्या पावसाबरोबरच गार वाराही वाहत आहे. त्यामुळे मुंबईची जीवन वाहीनी असलेल्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून वातावरण असेच राहीले तर त्याचा परिणाम मुंबईसह सर्व आजूबाजूच्या भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओखी वादळामुळे मुंबईत सतत पाऊस पडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला असून समुद्रात मोठ्या लाटा येण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर जावून संकट निर्माण होवू नये यादृष्टीने राज्य सरकारकडून मुंबईसह नवी मुंबई, पालघर आदी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

या वादळामुळे पहाटेपासूनच मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नागरीकांना नियोजित वेळेत कामावर जाण्यास उशीर होत आहे. तर काही जणांनी कामावर जाण्याऐवजी घरात राहणेच पसंत केले आहे.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून दादर चौपाटी, जूहू चौपाटी, गिरगांव चौपटी आदी समुद्र किनाऱ्यावर जाणारे सर्व मार्ग खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंद केले आहेत. तर मच्छिमारांनाही वादळाचा जोर ओसरेपर्यंत समुद्रात न जाण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे विभागानेही उशीराने धावणाऱ्या गाड्यांमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाल्यास योग्य पध्दतीने नियंत्रित करण्याचे आदेशही रेल्वे कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि कोस्ट गार्डच्या तुकड्याही तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *