Breaking News

अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील

मुंबई : विशेष प्रतिनिधी

मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली जात होती. परंतु राज्यात सत्तांतर होत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न झाल्याने राज्यात भाजपाच्या रूपाने संख्याबळाने मोठा आणि ताकदवान विरोधी पक्षाची जबाबदारी आली.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर शिवसेनेचा २५ वर्षे जुना आणि सत्तेत भागीदार असलेला भाजपा विरोधी पक्षात असल्याने भाजपाकडून विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. परंतु सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर पहिले ६ महिने राज्य सरकारला अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोणतेही प्रश्न विचारणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर करत सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्याअनुषंगाने मागील तीन अधिवेशनात भाजपाने सबुरीचा मार्ग स्विकारला.

परंतु आता कोविड काळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर होत असलेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच अर्थसंकल्पिय अधिवेशात भाजपाने आपले विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व दाखवून दिले. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईत तीन मोठ्या घटना घडल्या. त्यातील पहिली घटना म्हणजे बीडची तरूणी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या प्रकरणात महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह अन्य नेत्यांनी आक्रमक भूमिका स्विकारल्याने अखेर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घ्यावा लागला. दुसरी घटना दादरा नगर हवेलीचे सातवेळा निवडूण आलेले खासदार मोहन डेलकर यांनी तेथील प्रशासकाच्या जाचाला कंटाळून मुंबईत येवून आत्महत्या केली. राजकियदृष्ट्या हा मुद्दा खुपच संवेदनशील असताना देशपातळीवरील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह इतर पक्षांनी यावर पाहिजे तितक्या प्रमाणात जोर दिला नाही. तर तिसरी घटना प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा काही दिवसानंतर संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना.

यातील भाजपाच्या दृष्टीने संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना महत्वाची होती. त्यानुसार याप्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. या संपुर्ण प्रकरणात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी सचिन वाझे यांचे नाव फडणवीस यांनी विधानसभेत पुढे आणल्याने याप्रकरणाची चौकशी एटीएस मार्फत करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली. त्यामुळे सशक्त विरोधी पक्ष म्हणून भाजपाने दुसऱ्यांदा विधानसभेत अधिकृतरित्या नोंद केली. त्यानंतर जसे जसे दिवस जावू लागले तसे या प्रकरणातील पोलिस तपासातील काही गुढ मुद्दे आणि हिरेन यांच्या पत्नीचा जबाब आज विधानसभेत वाचून दाखवित विरोधी पक्षनेते म्हणून आपलेही रिस़ॉर्स आजही तगडे आहेत हे दाखवून देत काही पुरावेही सादर केले.

विरोधी पक्ष म्हणून भाजपाने स्विकारलेल्या आक्रमक धोरणांना प्रतित्तुर देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब यांनी प्रयत्न केला. परंतु  भाजपाच्या विरोधापुढे यांचेही काही चालले नाही. त्यामुळे या कालावधीत भाजपाच्या आक्रमक विरोधा पुढे विधानसभेचे कामकाज तब्बल ७ वेळा तहकूब तर ८ व्या वेळी दिवसभरासाठी बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.

फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे हे त्यांच्याकडे कसे आले या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी तर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी केली.

या दोन्ही आमदारांच्या मागणीला भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी न घाबरता खुशाल माझी चौकशी करा असे प्रति आव्हानच फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले. त्यामुळे राज्य सरकारला नेमके काय करावे ? असा प्रश्न पडला. भाजपाचा विरोध मावळावा आणि अधिवेशनाचे कामकाज पुढे चालावे यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात फडणवीस-भाजपाबरोबरील सरकारच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु फडणवीस-भाजपाने सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी मान्य होत नाही तो पर्यंत विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका एकप्रकारे असल्याचे दाखवून दिले.

त्यामुळे अधिवेशन संपण्यास अवघा उद्या बुधवारचा दिवस शिल्लक असताना सचिन वाझे यांच्यावरून विधानसभेचे कामकाज रोखून धरण्याचे काम भाजपाने करून दाखविले. यापार्श्वभूमीवर राज्यातील सशक्त विरोधी पक्ष म्हणून भाजपाने स्वतःची नवी ओळख निर्माण करण्यात यश मिळविल्याचे दिसून येत आहे.

 

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *