Breaking News

योगी आदित्यनाथ यांचा अवमान केल्याप्रकरणी आता भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी यवतमाळ पाठोपाठ नाशिकमध्येही अर्ज दाखल

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून यवतमाळमध्ये तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आता नाशिकमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली.

नाशिकमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे तक्रार अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन तक्रारी अर्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तर एक तक्रार अर्ज सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचं कौतुक केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तर सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन नाशिकमध्ये पोस्टर झळकावल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालच्या भाषेत टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी  अशी मागणी करणारे तक्रार अर्ज पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे करत लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. यात आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

शिवरायांचा राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांचा राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची…

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *