Breaking News

सरकारी भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूकीची संधी, ३ डिसेंबरपासून ईटीएफ खुला भारताचा कोणताही नागरीक करू शकतो यात गुंतवणूक

मुंबईः प्रतिनिधी
गुंतवणूकदारांना पुन्हा केंद्र सरकारच्या भारत बाँड ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. भारत बाँड ईटीएफ पुन्हा गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. त्याचा तिसरा टप्पा ३ डिसेंबरला सुरू होणार आहे. यातून १०,००० कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. ९ डिसेंबर रोजी हा ईटीएफ बंद होईल.
भारत बाँड ईटीएफ हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक केली जाते. सध्या ईटीएफ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘एएए’ रेटेड बाँड्समध्येच गुंतवणूक करते. एडलवाइज अॅसेट मॅनेजमेंट या योजनेचे फंड मॅनेजर आहेत. योजना माहिती दस्तऐवज आधीच भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल केले गेले आहे.
यापूर्वी भारत बाँड ईटीएफचा पहिला टप्पा डिसेंबर २०१९ मध्ये आणि दुसरा टप्पा जुलै २०२० मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारत बाँड ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ११,००० कोटी रुपये आणि पहिल्या टप्प्यात १२,४०० कोटी रुपये जमा झाले.
भारत बाँड ईटीएफ हा देशातील पहिला कॉर्पोरेट बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. गुंतवणूकदार भारत बाँड ईटीएफमध्ये १००० रुपये इतकी कमी गुंतवणूक करू शकतात. यानंतर, १,००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. एक्सचेंज ट्रेडेड फंड केवळ सार्वजनिक क्षेत्रातील एएए रेटेड बाँडमध्ये गुंतवणूक करते.
भारत बॉन्ड ईटीएफची मॅच्युरिटी कालावधी वेगवेगळी असते. परंतु यामध्ये लॉक-इन पीरियड नाही. ईटीफमध्ये मिळालेले युनिट हे शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. शेअर्सप्रमाणे त्याची खरेदी विक्री करता येते. गुंतवणूकदारास कोणत्याही कारणास्तव पैसे काढण्याची गरज भासली असेल तर तो आपली युनिट्स विकू शकतो. त्या दिवशी युनिटच्या किंमतीनुसार त्याला पैसे मिळतील. गुंतवणूकदार जेव्हा युनिट शेअर बाजारात विकतो त्यावेळी दुसरे गुंतवणूकदार युनिट खरेदी करतो.
भारतातील रहिवासी, एक अनिवासी भारतीय किंवा कंपनी, फर्म किंवा हिंदू अविभाजित कुटुंब भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकते. यासाठी त्याच्याकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. दोन मॅच्युरिटी कालावधी दरम्यान गुंतवणूकदार कोणताही पर्याय निवडू शकतात. ३ ते ५ वर्षांच्या मुदतीसह अल्प मुदत आणि १० वर्षापर्यंत मॅच्युरिटीसह दीर्घकालीन मुदत हे पर्याय आहेत. २०३० आणि २०३१ मध्ये मॅच्युअर झालेल्या भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्सनंतर ६ टक्के रिटर्न मिळू शकेल.

Check Also

बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि खाद्य पेये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका

देशात एकाबाजूला आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजत असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *