Breaking News

“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर ! चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी

सेवादलाच्या ऐंशीव्या पुनर्घटनादिनी देशाला संबोधताना, भारतरत्न अमर्त्य सेन यांनी स्किझोफ्रेनिया सरकारशी लढताना भारत हा भरपूर प्रतिकार शक्ती असलेला आणि उत्पादनाची कमाल क्षमता असलेला देश असल्याचं म्हटलं आहे. अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी आणि आंबेडकर यांच्या रस्त्यानेच अपार शक्यतांचा, अपार आशा, उमेद आणि संभावनांचा हा देश या संकटावर मात करू शकेल. पण देशाच्या निर्मात्यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांना गेल्या काही वर्षांमध्ये तडा जातो आहे. देशात करोनाचे संकट आहे, तितकेच संकट आयडॉलॉजीकल करोनाचे आहे.

आरोग्य सुविधांच्या अभावी माणसं मरत आहेत. गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या प्रेतांनी ती ‘शववाहिनी’ बनली आहे. धर्मद्वेषाच्या नावावर गंगा जमुनी संस्कृतीत विष कालवले जाते आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि मजुरांचे जीवन दुष्कर बनले आहे. शेतकरी बेजार आहे. प्रवासी मजुरांचे हाल होत आहेत. वंचित, उपेक्षितांच्या रेशनचा पत्ता नाही. तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. शाळा – कॉलेजं बंद आहेत. ३५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या बाहेर आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी आणि शेतकरी समाजात प्रचंड असंतोष आहे. आरक्षणाचा अधिकारच हिरावून घेतला जाईल काय? अशी भीती त्याला वाटते आहे. अल्पसंख्य समुदाय कधी नव्हे इतके असुरक्षित झाले आहेत.

या स्थितीत देशातील सर्व न्यायप्रिय जनतेने एकत्र आलं पाहिजे. कधी नव्हे इतक्या एकजुटीची आज गरज आहे. म्हणूनच आपल्या लोकशाही अधिकारांसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक होण्याचे आवाहन आम्ही सेवा दल आणि सर्व समविचारी प्रवाह एकत्र येऊन करत आहोत. आयडॉलॉजीकल करोनाने दुभंगलेला समाज जोडण्यासाठी, गावोगावी, शहरातील वार्डमध्ये जिथे सर्वांना एकत्र येता येईल, एकमेकांना मदत करता येईल, विषमता, अन्याय आणि भेदभावाच्या विरोधात एकजुटीने लढता येईल असे ‘संविधान घर/ संविधान केंद्र/ संविधान चौक/ संविधान पार्क्स’ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आणि स्थानिक नेतृत्वात उभी करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याला आपण ‘गाव, वार्ड तिथे संविधान घर’ आंदोलन म्हणू शकू.

संविधानातील भारत निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक पातळीवर लोकांच्या मनात संविधानातील मुल्य रूजविण्यासाठी लोकांना सहभागी करून घेतले जाईल.

प्रत्येक गावात , शहरात संविधान घर, भवन वा  सदन येथे दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी नागरिकांनी जमावं. तिरंग्याला अभिवादन करावं. संविधानाची प्रस्ताविका  तिथं लिहिलेली असेल. त्या प्रास्ताविकेचं जाहीर वाचन व्हावं. गावाच्या, वाॕर्डच्या, मोहल्ल्याच्या सार्वजनिक प्रश्नाची चर्चा करावी. स्थानिकांनी  योग्य ते उपक्रम चालवावेत. शेवटी राज्यघटनेला अभिप्रेत असा भारत घडविण्याचा निर्धार केला जाईल. या पध्दतीच्या कामात राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते पुढाकार घेतील. नागरिकांना संविधानिक मुल्यांच्या संवर्धनासाठी संघटित करतील.

राष्ट्र सेवा दलाच्या पुनर्घटनेला ४ जून २०२१ रोजी ८० वर्ष पूर्ण झाली आहेत. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सेवा दलाच्या निर्मिती मागे होता. महात्मा फुलेंच्या स्वप्नातला एकमय समाज निर्माण करणं हे सेवा दलाचं ध्येय आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत १०७ हुतात्मे सेवा दलाने दिले. साने गुरुजी आणि एस. एम. जोशी यांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने सेवा दल आजही सामाजिक न्यायासाठी काम करत आहे. लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि बंधुता या साठी सेवा दल कटिबद्ध आहे. आणि आता सध्याच्या परिस्थीतीस सामोरे जाण्यासाठी सेवादल ‘गाव तेथे संविधान घर’ राज्यव्यापी मोहीम राबवणार आहे.

सेवादलाच्या ह्या मोहिमेला महाराष्ट्रातील गावा गावातील, शहरा शहरातील  प्रत्येक संवदेनशील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आम्ही करत आहोत.

या ४० पुरोगामी विचारवंतांमध्ये गणेश देवी, बाबा आढाव, प्रकाश आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राजू शेट्टी, भालचंद्र कांगो, कपिल पाटील, कुमार सप्तर्षी, झहीर काझी, पन्नालाल सुराणा, उत्तम कांबळे, अभिजित वैद्य, निखिल वागळे, उल्हास पवार, लक्ष्मण माने, नितीन वैद्य, ज्ञानेश महाराव, संभाजी भगत, अशोक बेलसरे, शशांक राव, सुरेखा दळवी, विश्वास उटगी, नीरज हातेकर, अंजली मायदेव आंबेडकर, विजय जावंधीया, नीरजा, भरत लाटकर, सुभाष वारे, प्रतिमा जोशी, प्रतिभा शिंदे, प्रवीण बांदेकर, हसन कमाल, अरुण म्हात्रे, अतुल देशमुख, अर्जुन कोकाटे, राजा कांदळकर आदींचा समावेश आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *