Breaking News

चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्यापेक्षा आणखी वाढीव मदत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री बोलत होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सीगला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रायगडच्या पालक मंत्री कु. अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, खा.विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम चालू ठेवावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीचा शासन निर्णय आजच निर्गमित करुन वाटप तात्काळ सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचवण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *