Breaking News

निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन

श्रीवर्धन: प्रतिनिधी
मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र पॅकेज द्यावे अशी मागणी करत त्यासाठी राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भर देणार असल्याचे पक्षाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आश्वासन दिले.
रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री आदीती तटकरे, खासदार सुनिल तटकरे आदी उपस्थित होते.
रायगडमध्ये प्रामुख्याने आंबा, सुपारी, नारळ, काजूच्या बागा आहेत. तसेच भात शेती करणारेही शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. या वादळात फळबागा असलेली शेती मोठ्या प्रमाणावर उदवस्थ झाल्याचे दिसून येत आहे. या बागांचे नुकसान पाहता पुढील ८ ते १० वर्षे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त करत येथील घरांचे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या यंत्रांचा आणि वीज पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात आधी येथील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असे सांगत या भागासाठी स्वतंत्र पॅकेजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथकही येणार असल्याचे समजते. त्यामुळे वादळामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती या पथकाला देण्याचे आवाहन त्यांनी स्थानिकांना यावेळी केले.
या भागातील नुकसानकारक परिस्थिती पाहता केंद्राच्या मदतीशिवाय चांगले पॅकेज देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येवून यासाठी पॅकेज देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे पथक येवून गेल्यानंतर येथील पंचनाम्याची माहिती घेवून यासंदर्भात केंद्र सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी ८.३० वाजता मुंबईतून मोटारीने रायगडकडे प्रयाण केले. सकाळी ११. ३० वाजता माणगाव येथील बाजारपेठेची पाहणी केली त्यानंतर म्हसळा येथील मदरशाला भेट देत नुकसानीची माहिती घेतली. म्हसळा इथेच मोठ्या प्रमाणात शेडचे नुकसान झाले होते त्याची पाहणी केली तसेच स्थानिकांकडून माहिती घेतली. याशिवाय म्हसळा इथल्या रुग्णालयाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले होते त्याची पाहणी केली. दिवेआगारचे सरपंच उदय बापट यांच्या चिकू, नारळ बागेचीही पाहणी केली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. शरद पवार यांच्या पाहणी प्रवासात रस्त्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले तसेच वीजेचे खांब पडल्याचे चित्र होते. श्रीवर्धन, हरिहरेश्वर या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. जीवना बंदर येथील रहिवाशांनी आपल्या व्यथा पवारसाहेबांसमोर मांडल्या. त्यात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची व विभागात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांना सरकार तुमच्यासोबत आहे असा दिलासाही दिला.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *