Breaking News

निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर होता. गेल्या आठवड्यात निफ्टीने १७,५१९ ची पातळी गाठली. म्हणजेच निफ्टीमध्ये १० हजार अंकांची वाढ झाली. तेलापासून दूरसंचार क्षेत्रात पसरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने निफ्टीच्या १० हजारांच्या वाढीसाठी १० टक्के म्हणजेच एक हजार अंकांचे योगदान दिले.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सच्या शेअर्सच्या भाव सध्या २,४०० रुपये आहे. मार्च २०२० मध्ये या शेअर्सचा भाव ८७५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. मात्र, त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये हा भाव २३६८ रुपयांवर गेला.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने निफ्टीतील १० हजारांच्या वाढीमध्ये ५३२ अंकांचे योगदान दिले. त्याच वेळी आणखी एक आयटी कंपनी इन्फोसिसने ९६३ अंकांचे योगदान दिले आहे. म्हणजेच रिलायन्स नंतर इन्फोसिसने निफ्टीच्या वाढीसाठी सर्वाधिक योगदान दिले आहे. एचडीएफसी बँकेने ६११ अंकांचे तर एचडीएफसी लिमिटेडने ५७८ अंकांचे, आयसीआय बँकेने ५५२ गुणांचे योगदान दिले.

इन्फ्रा, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) सह अनेक क्षेत्रांनी ३२५ अंकांचे योगदान दिले. अॅक्सिस बँकेने ३१५, बजाज फायनान्सने ३०४ आणि कोटक महिंद्रा बँकेने २६० अंकांचे निफ्टीच्या वाढीत योगदान दिले. निफ्टीच्या १० हजारांच्या वाढीमध्ये बँकिंग क्षेत्राने अधिक योगदान दिले.

सरकारी कंपन्यांचे निफ्टीच्या वाढीत खूपच कमी योगदान राहिले आहे. सरकारी कंपन्यांमध्ये कोल इंडियाने १६, इंडियन ऑईलने ३९, एनटीपीसीने ५०, पॉवर ग्रिडने ५३ आणि भारत पेट्रोलियमने निफ्टीच्या वाढीसाठी ५३ अंकांचे योगदान दिले.

टीसीएस आणि इन्फोसिस या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दोघांचे शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर आहेत. टीसीएस १४ लाख कोटींपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली दुसरी कंपनी बनली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये गेल्या वर्षी मार्चपासून ३३ हजार अंकांची म्हणजेच १२९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २४ मार्च रोजी सेन्सेक्स २५,६३८ अंकांवर बंद झाला होता. गेल्या दीड वर्षात बाजारात भरपूर पैसा आला आहे. बाजारात पैसे येण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेली कपात. या कारणामुळे लोकांनी अधिक नफा मिळवण्यासाठी बँकांऐवजी शेअर बाजारात पैसे गुंतवले.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *