Breaking News

४८ तास महत्वाचे तर गुलाब नंतर आता शाहीन चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याचा मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीला इशारा

मुंबई: प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेली असली तरी या वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातलेला आहे. मात्र आणखी पुढील ४८ तास महत्वाचे असून यामुळे या वादळाचा प्रभाव आणखी राहणार आहे. यापार्श्वभूमीवर अरबी समुद्रात गुलाब चक्रीवादळ पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जर निर्माण झाले तर त्यास शाहीन चक्रीवादळ म्हणून ओळखले जाणार आहे.

तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ३-४ तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली.

‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.

राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी राहणार असला तरी बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक नदी, नाले, ओढे आदींना पूर आला. या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी जमिनच खरवडून गेली. बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील अनेक पुल, गावांना जोडणारे रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. तसेच अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात शेती जनावरेही वाहून गेल्याची माहिती पुढे येत आहे. तर यवतमाळमध्ये एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहितीही पुढे येत आहे.

Check Also

मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *