Breaking News

केरळवासियांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास तर पंढरपूर-मंगळवेढ्यात अविश्वास आमचा थोडक्यात पराभव - जयंत पाटील

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३७०० मतांनी पराभव झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने केरळमध्ये दोन ठिकाणी विजय मिळवित आपले खाते उघडले.

भालके यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यांचे सुपुत्र भगीरथ यांना होईल या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली. मात्र पंढरपूर-मंगळवेढा येथील नागरीकांनी भगीरथ यांच्या पारड्यात मतांचे दान टाकण्याऐवजी समाधान आवताडे यांच्या पारड्यात टाकले. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला समाधान आवताडे हे आघाडीवर होते. मात्र दुपारनंतर भगीरथ भालके यांनी पुन्हा आघाडी घेतल्याने या निवडणूकीत चुरस निर्माण झाली. अखेर संध्याकाळपर्यंत कधी आवताडे तर कधी भालके यांच्यात सुरु असलेला आघाडी-पिछाडीच्या खेळामुळे या निकालात चांगलीच रंगत निर्माण झाली. अखेर संध्याकाळी ३ हजार ७०० मतांनी आवताडे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केले.

आमचा थोडक्यात पराभव-जयंत पाटील

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. आज झालेल्या मतमोजणीत केरळमध्ये दोन ठिकाणी यशस्वी ठरलो. मात्र महाराष्ट्रातील पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो अशी कबुलीही  त्यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला असेही ते म्हणाले.

या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले आहेत.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *