Breaking News

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

या दोघांमध्ये आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने जवळपास एक तास चर्चा झाली. त्यानंतर या दोघांनी प्रसार माध्यमांसमोर आले असता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने आमच्यात चर्चा झाली. तसेच भाजपाला एक सशक्त पर्याय देण्याबाबतही आमची चर्चा झाली. भाजपाच्या विरोधात लढले पाहिजे, सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, निवडणूकीच्या अनुषंगाने आमच्यात चर्चा झाली. भाजपाला सशक्त पर्याय दिला गेला पाहिजे याबाबत जवळपास एकमत झाले आहे. परंतु काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय उभा करता येणार नाही.

बैठकीनंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं. “ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्याच्या मागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली. उद्धव ठाकरेंना प्रकृतीच्या कारणामुळे त्या भेटू शकल्या नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आगामी सार्वत्रिक निवडणूकांमध्ये भाजपाला सशक्त पर्याय देण्याविषयी दोघांमध्ये एकमत झाल्याने आगामी काळात भाजपाविरोधी पक्षांना एकत्रित करून मोठी आघाडी निर्माण करण्यात येणार असल्याचे एकप्रकारे संकेत या दोन्ही नेत्यांनी दिले. याशिवाय भाजपाला सशक्त पर्याय देताना काँग्रेसला डावलता येणार नसल्याची एकप्रकारे कबुली शरद पवार यांनी देत काँग्रेसशिवाय आघाडी उभे राहणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *