Breaking News

जयंत पाटलांचा कामाचा झपाटा; सकाळी ९ ते पहाटे ५, दिवस संपला दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावाही

बीड: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळत असून पाटील यांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता संपला.

दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.

कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी देत त्यांनाही दिले बळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेले तीन वर्षांपासून पक्षाशी प्रत्येक माणूस जोडत आहे. त्याअनुषंगाने आज बीड व परभणी येथे असताना डॉ. मधूसूदन केंद्रे, डॉ. नरेंद्र काळे, ॲड तोतला, उषाताई दराडे आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गाठीभेटी घेत त्यांनाही बळ दिले.

रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक

पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक रात्री १०.३० वाजता घेतली.

१२.३० वाजता मेहबूब शेख यांच्या घरी भेट व भोजन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या शिरूर कासार येथील निवासस्थानी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. उशीर झाला म्हणून बीडवरून शिरूर कासार येथे जाणे शक्य नव्हते मात्र कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मंत्री जयंत पाटील शिरूरकासार येथे गेले आणि तद्नंतर रात्री दोन वाजता अहमदनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी आढावा बैठकीला पोचले.

बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय

जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होणार असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि. २८ ) रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यासह महसूल जिल्हा परिषद जलसंपदा विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यासह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.

याप्रसंगी शेतीसाठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आले.

यावेळी जयंत पाटील यांनी प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सुचना विचारात घेवून योग्य ते निर्देश देवून कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी त्या कामांचा आढावा घेतला.

बैठकीत सुरुवातीला जलसंपदा विभागाच्यावतीने माहिती सादर करण्यात आली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती, कामे सुरू प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, प्रस्तावित प्रकल्पांबाबत, जिल्ह्यातील प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचनक्षमता, चालू वर्षातील उपलब्ध आर्थिक तरतूद व आवश्यक निधी, जिल्हयातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा,जिल्ह्यातील जलप्रकल्पांची सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *