Breaking News

सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश

मुंबईः प्रतिनिधी
जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
त्यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करतानाच याविरोधात देशातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातील मुस्लिम समाज आज भेटल्यानंतर मस्जिदचा विषय काढून नका सांगत आहेत. सत्ताधारी अयोध्येमध्ये राममंदीर बनवायला निघाले आहे. परंतु आम्ही मंदीराच्याविरोधात नाही आमचा कोर्टावर विश्वास असून कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करु असे मुस्लिम समाज सांगत आहेत असेही शरद पवार म्हणाले.
आज देशात नवीन पध्दत सुरु झाली नावे बदलण्याची…यावर बोलताना शरद पवार यांनी आग्रा येथील ताजमहल जो हिंदूस्थानची इज्जत वाढवत आहे. काय गरज आहे त्याचे नाव बदलण्याची…त्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का? असा सवाल करतानाच देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्याकडील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. देशासमोर बेरोजगारी,गरीबी अशा समस्या असताना नाव बदलण्याची गरज नाही. सत्ताधारी लोकांना चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे शिक्षणमंत्री राहिलेले मौलाना आजाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. आजाद यांच्यामुळे कला,साहित्य आणि सांस्कृतिक याच्यासह सर्वच क्षेत्रामध्ये नॅशनल इन्स्टियूट उभी करण्याचे काम झाले आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोचल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव आणि त्याठिकाणी मौलाना आजाद यांच्याबद्दल असलेला आदर याचे किस्से सांगितले. शिवाय त्यांनी आपल्या भाषणामध्ये लातूरमध्ये झालेला भूकंप आणि खडकपूर येथील तज्ज्ञांनी लातूरमध्ये उभारलेली घरे ही आजही टिकली आहेत ही देण आजाद यांची असल्याचेही पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये मौलाना आजाद यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच त्यांच्या स्वातंत्र्यलढयातील योगदानाबाबत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजाद यांनी शिक्षणाबाबत घेतलेले दुरदृष्टी निर्णय यामुळे देशात आयटी, टेक्नोसारखे प्रकल्प उभारले गेले आणि आज त्याची प्रचिती विदेशात शिकणाऱ्या तरुणांच्या गुणवत्तेतून दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता- जयंतराव पाटील
संविधान बदलण्याची भाषा केली जाते…महान व्यक्तींनी जो पाया घातला तो पाया हलवण्याचा प्रयत्न होतो आहे. सिस्टिम तोडली जात आहे. याकडे गांर्भीयाने पाहण्याची गरज असून त्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.
मौलाना आजाद यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार जयंतराव पाटील बोलत होते.
मौलाना आजाद यांनी शिक्षणात असे काम केले की ७० वर्षात ते कमी झालेले नाही. त्यांच्या शिक्षणातील योगदानाने क्रांती घडल्याचे सांगतानाच आजाद यांनी शिक्षणात एकच व्यवस्था हवी याचा आग्रह धरला होता. शिवाय त्यांनी सायन्सला प्राधान्य देत आयआयटीची निर्मिती केली. त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिले नसते तर आज वाईट अवस्था होती असे मतही जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.
आजाद यांच्या दुरदृष्टीमुळे शिक्षणात प्रगती घडली आहे त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्याबद्दल आदर राखला पाहिजे असे सांगतानाच आमच्या सरकारच्या काळात मौलाना आजाद महामंडळाची स्थापना पवारसाहेबांच्या विचाराने करण्यात आली. सच्चर समितीसाठी निधीची तरतुद बजेटमध्ये करण्याचे काम केले. महाराष्ट्र राज्य पहिले राज्य आहे ज्याने बजेटमध्ये सच्चर समितीसाठी निधीची तरतुद केली आहे असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मौलाना आजाद जयंतीनिमित्त कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर,अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, आमदार विदयाताई चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *