Breaking News

पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

वर्धाः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. राज्यात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात असा आरोपही त्यांनी केला.
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फारसे न बोलणारे मोदी यांनी पहिल्यांदाच शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका केली.
शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणूनच त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली, तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असा आरोपही त्यांनी केला.
भाजपा सरकार सर्व योजना वेळेत पूर्ण करेल असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केले. विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज वर्ध्यातील गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्री झोप लागणार नाही. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांचे काँग्रेस नेत्यांनी किती अनुसरण केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *