Breaking News

अखेर खा.सुप्रिया सुळेंच्या इच्छेने प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील अजित पवारांचे महत्व घटले

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य निवडीवरून पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादांवर अखेर खा. सुप्रिया सुळे यांच्या अंतिम इच्छेनुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड करत पडदा पडला. त्यामुळे संघटनांत्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी.पी.त्रिपाठी, अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून कोणत्याही एका प्रदेशाध्यक्षाला सलग दोन वेळा संधी देण्यात आली नव्हती. मात्र मावळते प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना अजित पवार यांच्या पसंतीनुसार सलग दोन वेळा संधी देण्यात आली. तरीही तटकरे यांनी दुसऱ्या टर्ममध्ये पक्षाच्या वाढीच्या अनुषंगाने फारसे काम केले नसल्याचा त्यांच्यावर पक्षांतर्गत आरोप करण्यात येत होता. त्यामुळे तटकरे यांना सलग तिसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यास खा. सुप्रिया सुळे यांचा विरोध असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने दिली.

काही दिवसांपूर्वी पक्षातील सर्व सन्मानिय नेत्यांच्या कामाचा आढावा खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून घेण्यात येत होता. त्यावेळी तटकरे यांची पक्षवाढीच्यादृष्टीने कामगिरी असमाधानकारक असल्याचे आढळून आले. त्यावेळी अजित पवार, शरद पवार यांच्या उपस्थितीतच खा.सुप्रिया सुळे यांनी तटकरे यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनिल तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात अल्पशी शाब्दीक चकमक उडाल्याचेही या नेत्याने सांगितले.

त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तटकरे यांच्याऐवजी जयंत पाटील यांच्या नावाचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला. तसेच विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर जयंत पाटील यांची प्रतिमा उद्योजक, सुशिक्षित राजकारणी म्हणून असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षवाढीसाठी मदत होईल अशी आशाही त्यांनी पवार यांच्याकडे बोलताना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार मागील आठवड्यात शरद पवार यांनी सलग तीन-चार दिवस जयंत पाटील यांना सोबत घेत विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर काय काय कामे करावी लागणार याविषयी सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच प्रदेशाध्यफदाच्या निवडीत अजित पवारांचे मत विचारात घेतले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहीर कार्यकारणी

प्रदेक्षाध्यक्ष- जयंत पाटील

उपाध्यक्ष-नवाब मलिक

प्रदेस सरचिटणीस पदी-शिवाजीराव गर्जे

अनुमोदन शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *