Breaking News

लसीकरणप्रश्नी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांची भूमिका वेगळी पवार म्हणतात ते मदत करतायत तर मंत्री टोपे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणतात ते देतच नाही

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील लसीकरणाची अनेक केंद्र कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्याची पाळी आल्याची भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडत महाराष्ट्राला मागणी पेक्षा कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात येत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवरच थेट हल्ला चढविला असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आरोग्य मंत्री राज्याला मदत करत असल्याचे वक्तव्य करत राज्याला होत असलेल्या लसींच्या पुरवठ्यावरून आपल्याच पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणल्याचे चित्र निर्माण आणले.

सकाळी राज्यातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सकाळी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधत राज्यातील परिस्थिती चिंताजनक आणि गंभीर असल्याचे सांगत केंद्र सरकारचासुध्दा यासाठी आग्रह आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय. त्याचप्रमाणे केंद्रसुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे असे सांगतानाच कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहे याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्र सरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठिशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे असल्याचे स्पष्ट केले.

पवारांच्या या संवादानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत सध्या महाराष्ट्राला साडे सात लाख डोस देतानाच उत्तर प्रदेशला ४८ लाख, मध्ये प्रदेशला ४० लाख, गुजरातला ३० लाख आणि हरियाणाला २४ लाख डोस पुरविण्यात आले. मग लसीकरणात अग्रेसर असलेल्या आणि सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला फक्त ७.५ लाख डोस का? असा सवाल केंद्र सरकारला विचारला.

तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशई बोलताना म्हणाले की, देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असा आरोप केला. तसेच काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे असा आरोप करत कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी शंकाही उपस्थित केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात की केंद्र सरकार मदत करतय तर त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री केंद्र सरकारच्या मदती करण्याच्या पध्दतीवरून शंका आणि प्रश्न उपस्थित करत नेमके कोण कोणाला ठरवतय हे कळायला मार्ग नाही.

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *