Breaking News

ड्रग्ज पार्टीतील कंभोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ताब्यात घेऊन NCB ने का सोडले ? दिल्लीतून भाजप नेत्यांच्या दबावामुळे तिघांना NCB ने सोडले-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते, मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपाचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत करुन पुन्हा एकदा भाजपा आणि NCB कनेक्शन उघड केले.

६ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB चे भाजप कनेक्शन उघड केले होते आणि आज नवाब मलिक यांनी भाजपा युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली.

रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत NCB च्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओही त्यांनी माध्यमांसमोर आणला.

क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली. ही धाड १२ तास सुरू होती. त्यातील ११ लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकरा जणांना NCB च्या कार्यालयात आणले होते. परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

क्रुझवरील ही धाड ठरवून केलेला फर्जीवाडा होता. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘त्या’ तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा अशी मागणी करत रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक NCB च्या कार्यालयात आले कसे. त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले.

केंद्रातील भाजप नेत्यांच्या दबावाखाली तिघांना सोडण्यात आले आहे. NCB च्या कारवाईत सुरुवातीपासून भाजपाचे कनेक्शन होते हे सिद्ध झाले आहे. हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच, परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे सांगत ज्या एजन्सीबद्दल सवाल उपस्थित करण्यात आले असताना त्याच एजन्सीला कशी माहिती देणार असा उपरोधिक सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना करतानाच याबाबत एखादे कमिशन नेमा अशी मागणीही त्यांनी केली.

NCB ने पत्रकार परिषद घेऊन आम्ही केलेले आरोप फेटाळून लावले आणि माझ्या जावयाला अटक केल्यामुळे त्यांनी हे केल्याचा आरोप केला. मात्र मी सुरुवातीपासून न्यायालयावर विश्वास ठेवून आहे. न्यायालयात जावई आपले निर्दोषत्व सिध्द करेल. मी पहिल्या पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला त्यावेळी न्यायालयात जाऊन दाद मागा असे सांगण्यात आले. आताही काही सवाल उपस्थित केले आहेत. जे लोकसेवक म्हणवून घेत आहेत त्यांनी या सवालांचे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणाले.

दरम्यान हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हेच ते फोटोग्राफ भाजपासंबधित व्यक्तींची आर्यन खान सोबत असल्याच संबध दर्शविणारे आणि एनसीबी कार्यालयात उपस्थिती दाखविणारे

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *