Breaking News

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत टकले यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी मिडियाशी बोलताना केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात अयोध्येत राममंदीर बनवण्याचा मुद्दा सेनेने उपस्थित केला त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार हेमंत टकले यांनी जोरदार टिका केली आहे.
लोकसभा निवडणूका जवळ आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज एक नवीन भाषण देत असतात त्यात एखादा नवीन विषय आणला जातो की, त्यामध्ये ना देशाचे ना राज्याचे हित असते. भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष आहे परतुं शिवसेना आपले विचार असे मांडते की मित्रपक्ष नाही तर शत्रूपक्ष आहे आणि सत्ता सोडत नाही आणि म्हणून ते आमचं काम आहे की सत्तेत राहून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे असे सांगत असतात.अरे हे कसलं राजकारण असा संतप्त सवालही आमदार हेमंत टकले यांनी यावेळी उपस्थित केला.
देशातील आणि राज्यातील सामान्य नागरिक हैराण झाला आहे. आज देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे…लोकांच्या काय समस्या आहेत… लोकांना असुरक्षित वाटत आहे… मॉब लिचिंगचे प्रकार होत आहेत… यासह प्रत्येक क्षेत्रात विदयार्थी खूष आहे ना शेतकरी खूष आहे ना कामगार आणि असंघटीत कामगार खूष आहेत… फक्त दिखावा सुरु आहे आम्ही हे करु… रामराज्य आणू… तुम्हाला चार वर्ष दिली ना जनतेने मग का नाही आणलं… का नाही काम केले… आणि ही कसली घोषणा अयोध्येत जाणार आणि राममंदीर बनवणार…यांनी बनवलं नाही मात्र ते आम्ही बनवू … हा सगळा लहान मुलांचा खेळ सुरु आहे… ही मनोहरी कहानी आहे… याचा लोकांना आता त्रास होवू लागला आहे आणि या गोष्टीवरही लोकांचा भरोसा राहिलेला नाही अशी जोरदार टिकाही आमदार हेमंत टकले यांनी केली.
शिवसेना आपली शक्ती सांभाळण्यासाठी प्रत्येकवेळी काही ना काही प्रयत्न करत असते तसाच प्रयत्न स्वबळावर लढण्याचा त्यांचा आहे परंतु शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार यांना माहित आहे की,भाजपसोबत नाही गेलो तर आपला पराभव होणार आहे. ही वास्तवता आहे हे त्यांना माहित आहे परंतु शिवसैनिक बिथरु नये म्हणून त्यांच्यामध्ये हिंमत वाढवण्यासाठी कोणती ना कोणती घोषणा करणे जास्त गरजेचे असते. परंतु दसऱ्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे शिवाजी पार्कामध्ये झालेल्या भाषणामध्ये दम नव्हता. ही एकप्रकारची अपॉलॉजी होती म्हणजे आम्ही काही करत नाहीय आणि काही करु शकत नाही आणि म्हणून अयोध्दा जाण्याचा संकल्प जाहीर केला असा टोला आमदार हेमंत टकले यांनी लगावला.
देशात…राज्यात इतक्या मोठया गंभीर समस्या आहेत…पाण्याची समस्या आहे…शेतकरी आत्महत्या होत आहेत…बेरोजगारी वाढलीय…याकडे लक्ष नाही…त्यांचा ब्युरोक्रसी आणि व्यवस्थापनावर कंट्रोल राहिलेला नाही. मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एकत्र बसतात आणि यांना एकमेकांना माहित नाही काय घडत आहे त्याबाबत…याप्रकारचं राजकारण सुरु राहिलं तर संपूर्ण राज्य आणखी १०-१५ वर्ष मागे जाईल अशी शंकाही आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.
भाजपचे पंतप्रधान आणि अध्यक्ष अमित शहा यांनी इव्हेंट तयार करायचंच ठरवलं आहे… शिर्डी हे कोटयवधी लोकांचे श्रध्दास्थान आहे. तिथे जावून भाषण देणे आणि त्यातून दाखवून देणे की,आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्यातच महाराष्ट्रातील दुष्काळाप्रसंगी केंद्रसरकार तुमच्या पाठी उभी आहे. परंतु राज्यातील जलयुक्त शिवारसारखी योजना फसली आहे. त्याची आज स्थिती काय आहे, किती तलावामध्ये पाणी उपलब्ध आहे, किती गावात टॅकर सुरु आहेत आणि ही वास्तवता आहे. लोकांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना कधी माफ करणार नाही असा इशाराही आमदार हेमंत टकले यांनी दिला.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *